Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Monday, 2 April 2012

आमची शाळा - भाग १

शाळा चित्रपट पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा आई वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर पुन्हा कुणी उचलली नाही. उचलली ती केवळ लेखणीच. असो तर महत्वाच हे की आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची भटकी जमातच झाली होती. बदली झाली की शाळा बदलली. मी आरवलीत माझी बालवाडी पूर्ण केली. आरवली म्हणजे शिरोड्याच्या बाजूलाच पेडण्याहून अगदी जवळ. पुढे पहिली-दुसरी आणि तिसरी इयत्ता उभादांडा शाळा नं. २ मध्ये, चौथी ते सातवी मठ शाळा नं. १, आठवी - दहावी जनता विद्यालय तळवडे, अकरावी - बारावी राणी पार्वतीदेवी ज्यु. कॉलेज सावंतवाडी, पदवी शिक्षण कुडाळ आणि पदव्युत्तर रत्नागिरी.

कॉलेज विश्व हे एक वेगळंच जीवन असत. शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोरून माझ पाचवी ते दहावीच जीवन एखाद्या फिल्मसारख सरकत जात. विशेषतः हायस्कूल. सावंतवाडीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर तळवडे नावाच एक सुंदर गाव आहे. जबरदस्त सांस्कृतिक आवड असलेलं गाव. येथे बाराही महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच. मी त्यावेळी अनेक प्रसिद्ध नाटके याच गावातील रंगमंचावर पाहिली. श्रीमंत गाव. तर अश्या या गावात आमच श्री जनता विद्यालय आहे. शाळेतले ते दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आमच्या या शाळेत तीन तुकड्या होत्या अ, ब आणि क. मी अ तुकडीतला विद्यार्थी होतो. गावातील तथाकथित सुशिक्षित लोकांना कॉन्व्हेंट च आकर्षण होत. पण अस आकर्षण आम्हाला कधीच नव्हत कारण जनता विद्यालयात जे शिक्षण मिळणार ते कितीतरी पटीने चांगल असेल याची आम्हाला खात्री होती.

तीन वर्षाने शाळेने मला बरच काही दिल. मला आमचे पाटकर सर कायम आठवतात. असा दरारा की लांबून त्यांना बघितलं की मुल पळून जायची. पाटकर सरांबद्दल आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या हातचा मार खायची हिंमत कोणातच नव्हती. सरांचा तास असला की सर आम्हाला संपूर्ण जगाची फेरी मारून आणायचे. जागतिक घडामोडी आणि त्याचा परिणाम याची आवड मला याच दरम्यान निर्माण झाली. Y2K काय आहे हे आमच्यापेक्षा मोठया असलेल्या मुलांना माहिती नव्हते पण आम्हाला मात्र पूर्ण माहिती होती. कारण फक्त पाटकर सर. पेडणेकर सरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. सहामाही परीक्षेत मराठीत केवळ ४८ मार्क्स मिळाल्याच दुःख माझ्यापेक्षा पेडणेकर सरांना जास्त होत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल आणि दहावीत मी ७८ गुण मराठीत मिळवले. शिस्त मोडल्यावर मालवणकर सर आणि गणिताच्या पवार सरांच्या हातचा मारही खाल्ला. मार कसला थोबाडीतच मारली होती. सगळ जग हलल्यासारख वाटल होत. पण एकदा मार खाल्ल्यावर पुन्हा शिस्त मोडण्याची हिंमत नाही झाली.

आमच्या वर्गात तशी इरसाल मुले होती. मला अजूनही आमचा अड्डा आठवतो. शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही जवळच्या सातेरी मंदिरात जमायचो. त्यावेळी मी घोडेस्वार होतो अर्थात सायकल. हे मंदीर परिसर म्हणजे सायकल फिरविण्याची आवडती जागा. जरा पुढे उंचावर एक छोट मंदीर होत आता नाव नाही आठवत पण तोही आमचा अड्डा होता. प्रार्थना चुकविणारी मुले तिथे थांबायची. मला आठवतंय प्रार्थना चुकली तर शिक्षा असायची. चुकून कधी उशीर झालाच तर ही शिक्षा चुकविण्यासाठी आम्ही सरांची नजर चुकवून हळूच रांगेत घुसायचो. शाळेच लांबच्या लांब मैदान आम्ही फुटबॉल खेळण्यासाठी वापरायचो. दुपारची जेवणाची सुट्टी त्यासाठीच होती. पटापट डब्यातल खावून गेटावरच्या दुकानात जावून वाटाणे किंवा फुटाणे आणायचे (आम्लेट पाव ही आमच्यासाठी त्यावेळी पार्टी दिल्यासारखच होत.) आणि ते संपवून नंतर रबरी छोट्या बॉलने फुटबॉल खेळायचा हा आमचा नित्यक्रम झाला होता. मला आठवतय मी, दोन अमित, रोशन, कांता, विवेक आणि आमचे इतर मित्र कधी एकदा मैदानावर जायला मिळतय याची वाट पाहात असायचो.

किस्से अनेक आहेत पण कायम स्मरणात राहण्यासारखा किस्सा म्हणजे आमची शालेय निवडणूक अगदी थाटात असायची. मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, वर्गमंत्री वगैरे सगळी पद असायची. मीही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची निवडणूक याच काळात लढलो. आमच्या शाळेत प्रचारही करणे बंधनकारक होत. अगदी सभा वगैरे सगळ चालायचं. मी क्रीडामंत्री या पदासाठी उभा होतो. तरी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात माझी उमेदवारी मजबूत होती. प्रचार सभा घेतली. गंमत म्हणजे माझ्या विरोधी पक्षातील मुलांनी मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो आहे अशी अफवा पसरवली. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्याशी माझी बाचाबाची देखील झाली आणि माझ निवडणूक हरणं नक्की झाल. मतदानाचा दिवस उजाडला. निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता. मला दोन नंबरची मत मिळाली होती. नियमाप्रमाणे मी उपमंत्री झालो होतो. केवळ दहा मतांनी मी हरलो होतो पण हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या लोकशाही परंपरेनुसार आपला देश चालतो त्याच बाळकडूच आम्ही प्यालो होतो.

शाळा म्हटल की लाईन हा विषय आलाच पण त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही एकमेकांना खूप चिडवल लाईनच्या नावावरून. अगदी बापाच्या नावावरुनही चिडवलय. आमच्याकडे बिलीमारो पण होता, बेलदार पण होता आणि टिंग्या पण होता. अगदी प्रत्येक शाळेत असतो त्याप्रमाणे. शाळेबद्दल लिहाव तेवढ कमी आहे. शाळा सोडून जाताना प्रत्येकाला दुःख हे होत असतच. शाळा आपल्याला आठवणीची शिदोरी देते. आयुष्यभर पुरण्याइतकी.

Wednesday, 7 March 2012

राष्ट्रीय पुरस्कार

देऊळ आणि बालगंधर्व या चित्रपटांच्या टीमचे मनापासून अभिनंदन. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊळ या मराठी चित्रपटाला जाहीर झाला आहे. देऊळ चित्रपटातील कलाकार गिरीष कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाही प्रादेशिक चित्रपटांचा दबदबा कायम राहिला. बालगंधर्व या मराठी चित्रपटाला मेकअप आणि वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. असेच दर्जेदार मराठी चित्रपट सतत मराठीचा झेंडा फडकवत ठेवतील हीच अपेक्षा.

Sunday, 15 January 2012

पानिपत - एक शौर्यगाथा


पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले.  दत्ताजी शिंदेंचा  "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत. महाराष्ट्रात मकर संक्रात साजरी होत असताना तिथे पानिपतात लाखो मराठे धारातीर्थी पडले. हजारो मराठी कुटुंब उध्वस्त झाली. या युद्धाचा मराठी मनावर गंभीर आघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा प्रचंड प्रतिकार करणारा मराठ्यांचा प्रमुख सरदार इब्राहिम खान गारदी पकडला गेला. त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारण्यात आले. मराठी साम्राज्याची रक्षा करता करता बलिदान दिलेल्या त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन.. या स्मृती दिनाच्या निमित्याने स्टार माझाने खास कार्यक्रम प्रक्षेपित केला होता त्याचे युट्यूबवरील व्हिडिओ लिंक मी येथे देत आहे. जरूर पहा.        




Saturday, 14 January 2012

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


मकर संक्रांतीच्या, लोहीरीच्या आणि पोंगलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

Tuesday, 1 July 2008

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात.

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.

मटा हेल्पलाइन

Friday, 27 June 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.


खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.

राज्यात प्रथम - गौरव कुलकर्णी (९७.८४%)
मुलींमध्ये पहिल्या - पूजा वानखेडे (यवतमाळ), सायली रूपसिंह सागर (उमरगा)- ९७.२३ %
रात्र शळेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (नागपूर) ८८.१५ %
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव ९६.४६ %
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ %

Tuesday, 24 June 2008

सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन

Subscribe in a reader


सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन Top Blogs

सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन आयोजित करण्यास अनेकांनी प्रखर विरोध केला आहे. याविषयी आपले मत काय आहे? हा विरोध योग्य आहे का? हे साहित्यसंमेलन रद्द करुन भारतात घ्यावे का? आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

कृपया कोणावरही वैयक्तीक टीका नको. सभ्य भाषेचा वापर करा. धन्यवाद. प्रतिक्रिया देण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 23 June 2008

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता

Subscribe in a reader

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता Top Blogs


  • ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.
  • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करण्यात येणार नाही.
  • या ब्लॉगमध्ये कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
  • आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती या ब्लॉगवरुन प्रसारीत केली जाणार नाही.
  • राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण या ब्लॉगमधून होणार नाही.
ही आचारसंहिता माझ्या अन्य ब्लॉग्जलाही लागू आहे. कालानुरुपे या आचारसंहितेत नवीन कलमे लिहीली जाटील


AddThis Feed Button

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

लोकशाही देशात प्रत्येक व्यक्तीला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दीले आहे. अगदी सामान्य माणसाला त्याची मते मांडण्याचा अधिकार फक्त लोकशाहीत मिळतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलेली लोकशाही लोकशाही नव्हेच. मित्रांनो आपल्या या सर्वात मोठया लोकशाही देशात अजूनही लोकशाही रुजलेली नाही. लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. पण विचार करायची क्षमता नसलेले लोक हिंसेने प्रत्युत्तर देतात तिथेच लोकशाही पायदळी तुडवली जाते. जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही हुकूमशाही असलेला देश यशस्वी होवू शकला नाही. लोकशाहीत लोकांच्या मतांना विचारात घेणे गरजेचे असते पण जमावाची मते विचारात घेतली तर लोकशाही फसू शकते. कारण जमावाला विचार करण्याची शक्ती नसते. जमाव भावनेच्या भरात कृती करत असतो आणि या जामावाचे फायदे घेणारे स्वार्थी असतात.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी हा शब्दच सरकार किंवा एखाद्या समुहाकडून उच्चारला जाणे अभिप्रेत नसते. आता प्रश्न उठतो की जर कोणी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला तर काय करायचे? सध्या आपण बघतच असाल की दूरचित्रवाहिन्या कशा स्वरुपाच्या बातम्या प्रसारीत करीत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमात दाखवली जाणारी भारतीय संस्कृती कोणी परदेशी व्यक्तीने पाहिली तर त्याचा मोठा गैरसमज व्हायचा. त्याला वाटायचे की भारतीय कुटुंबातील स्त्रीया ह्या स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांच्या सुपाऱ्या देतात. सासूचा जन्म हा आपल्या सूनेला छळण्यासाठी झाला असावा. या मालिकांमधिल विवाहपूर्व आणि विवाहानंतरचे संबंध पाहिले तर या परदेशी व्यक्तीला आपण कुठे तरी मागे पडतोय ही भावना स्वस्थ बसू देणार नाही.
वृत्तवाहिन्यांनी तर ताळतंत्रच सोडलय. चांगल्या बातम्या तर सोडाच खऱ्या बातम्या मिळतील याचीही खात्री नाही. या वाहिन्यांना कोणतीही आचारसंहिता नाही. चांगल्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी बीबीसी आणि दूरदर्शन हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.

by Vikram Nandwani Sir
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही महत्त्वाची आहे. जबाबदारी सर्वांनाच लागू होते. वृत्तपत्रे,दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ब्लॉगर्स या सर्वांनाच जबाबदारी लागू होते. पण ही जबाबदारी स्वतःहून स्विकारलेली असणे आवश्यक आहे. दुसऱ्यांनी ती जबरदस्तीने लादणे आभिप्रेत नाही. काय लिहावे आणि काय प्रसारीत करावे याची एक नियमावली प्रत्येकाने स्वतः तयार करणे आवश्यक आहे. भारतीय दूरचित्रवाणी अथवा वृत्तपत्रे अशा स्वतः ठरविलेल्या नियमावलीचे कठोर पालन करताना दिसत नाहीत. पण ब्रिटनमधील वृत्तपत्रे कठोरपणे आचारसंहितेचे पालन करतात. त्यासाठी त्यांनी प्रेस कंप्लेंन्ट कमिशन ची स्थापना केली आहे. भविष्यात ब्लॉग्ज हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास येणार आहे. मराठी ब्लॉगींग विश्व हे अजून बाल्यावस्थेत असले तरी हे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. तेव्हा या माध्यमावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतानाच जबाबदाऱ्या पाळणे गरजेचे ठरणार आहे. या जबाबदाऱ्या स्वतःच ठरवलेल्या असाव्यात उदा.

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता-

ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.

दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.

ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.

ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करण्यात येणार नाही.

या ब्लॉगमध्ये कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती या ब्लॉगवरुन प्रसारीत केली जाणार नाही.

राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण या ब्लॉगमधून होणार नाही.

ही आचारसंहिता माझ्या अन्य ब्लॉग्जलाही लागू आहे. कालानुरुपे या आचारसंहितेत नवीन कलमे लिहीली जातील.

Thursday, 19 June 2008

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?


आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

Tuesday, 17 June 2008

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता सातवी) या वर्षी ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग कुडाळ हायस्कूलचा चैतन्य दिलीप राणे आणि कोल्हापूरचा वैभव पाटील या दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २८६ गुण मिळाले. कुडाळने आपली विजयी परंपरा कायम राखली असून याच प्रशालेतील सौरव घुर्ये हा राज्यात तिसरा आला. शहरी विभागात सोलापूरची तेजश्री कोरे , चाळीसगावचा स्वप्नील अमृतकर पहिले आले. त्यांनाही २८६ गुण मिळाले. या सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या पुढील आयुष्यातही असेच यश मिळवा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा.

Monday, 16 June 2008

शिवशक ३३५ प्रारंभ

शिवशक ३३५ प्रारंभ

आज शिवशक ३३५ मधला पहिला दिवस. शिवशकानुसार ३३५ वर्षांपूर्वी याच दिवशी तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. परकिय सत्तेचा गुलाम झालेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले होते. मराठी साम्राज्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वांना शुभेच्छा.

Thursday, 12 June 2008

वाचनीय लेख - केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?


वाचनीय लेख

आजचा
.टा. वाचलात का? त्यात "केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?" हा संजय व्हनमाने यांचा लेख प्रसिध्द झाला आहे. त्याची लिंक खाली देतो आहे. तेथे टिचकी मारा.

----> http://maharashtratimes.indiatimes.com/


हेच ते सरकारी संकेतस्थळ जेथे शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला नाही. -
----> http://india.gov.in/knowindia.php

हा दुर्लक्ष संतापजनक आहे. सरकारी संकेतस्थळावर हा दुर्लक्ष मुद्दाम केला गेला आहे का? दिल्लीतील मराठी नेते गप्प कसे ? गुरुनानक,औरंगजेब,नादिरशहा या सगळयांचा उल्लेख आहे मग शिवाजी महाराजांचा का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थीत होतात. म्.टा. ने हे सगळे उघडकीस आणले, त्याबद्दल .टा.चे अभिनंदन.

- वामन परुळेकर


Wednesday, 11 June 2008

समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज


समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूज



सोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो शक्तिशाली स्फोटासाठी हा फ्युज बॉम्बबरोबर जोडला जातो. मोठया युध्दनौका नष्ट करण्यासाठी ह्या बॉम्बचा वापर होतो. नजिकच्या काळात कोणतेही मोठे युध्द झालेले नाही. मग हे फ्युज आले कुठून ?


* याच किनाऱ्यावर फ्युज सापडले


गोवा येथील नौदलाच्या पथकाने सदर फ्युजची तपासणी केली. तत्पूर्वी देवबाग या ठीकाणी उच्च दाबाचे कार्बनाडाय ऑक्साइड वायु भरलेले सिलेंडर आढळून आले होते. वेंगुर्ले परीसरातही असे तीन सिलेंडर सापडले होते.

समुद्रकिनाऱ्यावर वारंवार अशा संशयास्पद वस्तू आढळून येतात.ही भावी युध्दाची तयारी तर नव्हे ना? या वस्तू शत्रुच्याही असू शकतात त्यामुळे त्यांची योग्य दखल सरकारने घ्यावी.

Saturday, 7 June 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ११ बारावी

माहितीपर संकेतस्थळे भाग - ११

बारावीच्या परिक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन . तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून जावू नये. ही काही शेवटची संधी नव्हे पुन्हा प्रयत्न करा.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. करीयर मार्गदर्शनासाठी खाली काही संकेतस्थळे देत आहे. जरुर भेट द्या..

Sunday, 1 June 2008

माझे ब्लॉगींग .....

माझे ब्लॉगींग .....

तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.

या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.

कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.

खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?

प्राजक्ताने आज कोणत्या पाककलेबद्दल लिहीले आहे?

आज मोरपीसमध्ये नविन काय आहे?

आज महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?

यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून २ तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा, चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.

मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.

जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि रुचिरा कधी सोबती बनल्या कळलेच नाही. चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......

- वामन परुळेकर

Sunday, 11 May 2008

बळी

सौरभ सहारनपूरच्या सिमेवर उभा होता. सहारनपूर शत्रूसैन्याच्या हल्ल्यात बेचिराख झालेले शहर. सौरभ कसाबसा या शहरातून निसटला होता. त्याचे प्राण वाचले होते पण तो निराश होता. या हल्ल्याच्यावेळी तो काहीच करु शकला नव्हता. शत्रु देशाची विशाल सेना त्याच्या गावावर तुटून पडली होती. माणुसकीचा गंधही नसलेल्या या हैवानांनी त्याच्या गावाचे स्मशाण केले होते.

गेले तीन दिवस सौरभ उपाशीपोटी आपले प्राण वाचवत जंगलातून फिरतोय. उंच डोंगरावरुन त्याला गावातील दृश्य दिसत होते. सगळीकडे आगीचे लोट. शत्रु सैन्य माघारी फिरले तसा सौरभ गावाकडे वळला. दबक्या पाउलांनी त्याने गावात प्रवेश केला. काहीच शिल्लक नव्हते. सैतानांनी सर्वाना मारले होते. एखादा चुकून जिवंत राहीला असेल तर त्याला मरेपर्यंत भाला खूपसून मारण्यात आले होते. आपल्या गावाची स्थिती पाहून सौरभ कोसळलाच.

हे सगळे का आणि कशासाठी ? जमिनीच्या टीचभर तुकडयासाठी.
राज्याच्या सीमेचा वाद राजांचा त्यात आमचे काय चुकले? सौरभ स्वतःशीच बडबडत होता.

माझ्या गोरगरीब गावकऱ्यांनी काय पाप केले होते? सौरभ आक्रोश करत खाली पडला.

एव्हाना राजाला हल्ल्याची बातमी कळली. त्याने आपल्या सेनेला बदला घेण्याचे निर्देश दिले. आता शत्रु पक्षातील एखादे गाव असेच जळणार आणि सुडाची ही साखळी अशीच सुरु राहणार.

- वामन परुळेकर

Saturday, 10 May 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या दोन्ही परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन. परिचारिकांचे काम अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या या परिचारिकांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य ठरते. १२ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

Wednesday, 7 May 2008

अक्षयतृतीया

सर्व मराठी बांधवांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

अक्षयतृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तां पैकी एक मानला जातो. ही अक्षयतृतीया आपल्या जीवनात सुख आणि समृध्दी घेउन येणारी ठरो हीच प्रार्थना.
धन्यवाद.


Tuesday, 6 May 2008

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters