Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Sunday, 29 May 2011

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 

गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 

२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    

८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   


Thursday, 13 August 2009

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा. दोन दिवसानंतर आपण नव्या युगात प्रवेश करु. या निमित्ताने गेल्या वर्षी सुरु केलेली "स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे" ही लेखमाला पुर्नप्रकाशीत करत आहे. धन्यवाद.

स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-1)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म - २३ जुलै,१८५६ -- मृत्यू - १ ऑगस्ट, १९२०
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.
टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.
>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>ओरायन
>गीतारहस्य



स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-2)
महात्मा मोहनदास करमचंद गांधी

जन्म - ऑक्टोबर २, १८६९ -- मृत्यू - जानेवारी ३०, १९४८

महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.

भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह,दांडी यात्रा,विदेशी हटाव,स्वदेशी जागरण,भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.

महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....

Monday, 16 June 2008

शिवशक ३३५ प्रारंभ

शिवशक ३३५ प्रारंभ

आज शिवशक ३३५ मधला पहिला दिवस. शिवशकानुसार ३३५ वर्षांपूर्वी याच दिवशी तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. परकिय सत्तेचा गुलाम झालेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले होते. मराठी साम्राज्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वांना शुभेच्छा.

Friday, 21 March 2008

विजयदुर्ग सफर



मुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.



किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे

>महादरवाजा
>तोफखाना
>दारुभंडार
>भुयारी मार्ग
>सदाशिव बुरुज
>खलबतखाना
>अश्वशाळा
>सदर
>गोविंद बुरुज
>चोरदरवाजा


- वामन परुळेकर

Thursday, 20 March 2008

दिल्ली लुटली

दिल्लीचा पाडाव
१७३९ साली आजच्याच दिवशी नादिरशहाने दिल्ली वर कब्जा केला आणि दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटली आणि इराणला पाठविली. मोठया स्वरुपात भरुन येणारी वित्तहानी झाली. हे मयुरासन सतराव्या शतकात मुघल बादशाह शाहजहान साठी तयार करण्यात आले होते. हे रत्नजडीत मयुरासन दिवान--आम मध्ये ठेवण्यात आले होते. या मयुरासनाची तत्कालिन किंमत करोड ते १० करोडच्या दरम्यान होती. दिल्लीचा पाडाव झाल्यानंतर नादिरशह मे १७३९ला परत निघाला. फेब्रुवारी १७३९ ते मे १७३९ दरम्यान तो भारतात होता.

मयुरासन

नादिरशहा हा इराणी साम्राज्याचा पाया होता. काही इतिहासकार त्याची तुलना नेपोलिअनशी करत असत. त्याने बलाढय साम्राज्य उभे केले होते. १७३८ च्या अखेरपर्यंत हे साम्राज्य कंदहार पर्यंत पसरले होते. नादिरशाहचा डोळा मुघल हिंदुस्थानवर होता. काबूल,गजनी करत नादिरची विशाल सेना लाहोरला पोचली. हिच योग्य वेळ आहे हे नादिरने ओळखले होते. मराठा साम्राज्याने मुघल साम्राज्याला खिळखिळे केले होते. अशा स्थितीत मुघलांचा पाडाव शक्य होता. फेब्रुवारी १७३९ ला कर्नाल मध्ये मुघलांचा पाडाव झाला. मोहम्मद शाहला अटक झाली. नादिरच्या सेनेने दिल्लीत प्रवेश केला. मुघल बादशाह अटकेत गेल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. बदला म्हणुन काही भारतीय राजांनी पर्शियन सेनेवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. नादिरला हे कळले, तेव्हा त्याने आपल्य सेनेला बदला घ्यायचा हूकुम दिला. २२ मार्च १७३९ तो काळा दिवस दिल्लीत बदल्यापोटी एका दिवशी २०००० ते ३०००० लोकांची हत्त्या झाली. मुघल बादशहा मोहम्मद शहा ने नादिरची माफी मागितली. नादिरने सैन्याला थांबण्याचे आदेश दिले.

बदल्यात बादशहाने शाही खजान्याच्या चाव्या नादिरकडे सुपूर्द केल्या. नादिरने मयुरासन,कोहीनूर,दर्यानूर,असंख्य रत्ने लुटली. मे १७३९ ला नादिर इराणकडे निघाला तेव्हा त्याच्या बरोबर हजारो हत्ती,घोडे आणि उंट होते. लुटीचा माल एवढा होता की इराण मध्ये तीन वर्षे सर्व कर माफ होते.





संदर्भ
-
द ज्वेल्स ऑफ इराण -- http://www.geocities.com/Pentagon/Base/1406/jewel/imperialjewels.html

नादिर साम्राज्य -
http://www.angelfire.com/empire/imperialiran/golestan.html

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters