Tuesday 29 April 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ६


माहितीपर संकेतस्थळे भाग - ६ (नेटबीन्स)


मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील सहावे पुष्प आहे..
नेटबीन्स.ओ.आर्.जी

आपण जावा प्रोग्रामर आहात का? आपल्याला जावा कोडींग करण्याची आवड आहे का? जर होय तर हे संकेतस्थळ आपल्याला उपयोगी पडेल. या संकेतस्थळावरुन तुम्ही नेटबीन्स स्टार्टर कीट DVD ऑर्डर करु शकता. ही मोफत DVD उपलब्ध आहे. या DVD मध्ये नेटबीन्स IDE ६.१, JDK ६.०, जावा टयुटोरीअल्स, नेटबीन्स टयुटोरीअल्स समाविष्ट केले आहेत.

या DVD मध्ये Windows, Linux, Solaris x86, Solaris SPARC आणि Mac OS X या ऑपरेटींग सिस्टीमच्या डिस्ट्रीब्युशन फाईल्स उपलब्ध आहेत. ही DVD चार अन्य भाषांमध्ये उपलब्ध आहे अनुक्रमे चायनिज, पोर्तुगाली ब्राझीलीयन आणि रशियन.

येथे क्लिक करा आणि मोफत DVD साठी फॉर्म भरा.



हास्य-विनोद

शिक्षिका - अरे निलेश असे विचित्र सॉक्स का घातलेस. एका पायात निळा आणि दुसऱ्या पायात हिरवा.

विद्यार्थी - हो मॅडम फारच विचित्र जोडी आहे. माझ्या घरी पण सॉक्सची अशीच एक जोडी आहे.



शिक्षिका - अरे निलू तुझा "माझी गाय" हा निबंध अगदी तुझ्या भावाने लिहीला तसाच आहे. तू नक्कीच कॉपी केलीस.

निलू- नाही मॅडम आमच्याकडे एकच गाय आहे. आम्ही दोघांनी एकाच गायीवर निबंध लिहीला आहे.


हास्य-विनोद

गणिताचे शिक्षक - मुलांनो जर a=b आणि b=c तर a=c .
कळले का? चला मला आता याचे एक उदाहरण द्या. सोनू तू एखादे उदाहरण दे.

सोनू- सर, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता याचाच अर्थ मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो.

Monday 28 April 2008

गगनभरारी

गगनभरारी
आजचा दिवस भारतीय अवकाश क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल. आज श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही सी-9" चे यशस्वी उड्डाण झाले. एकाच वेळी दहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. हा एक विक्रमच आहे. यापूर्वी रशियाने एकाचवेळी सोळा उपग्रह सोडले होते पण त्यांचे एकत्रित वजन ४०० किलो होते. भारतीय उपग्रहांचे वजन ८२० किलो आहे. या प्रक्षेपणानंतर भारताने प्रक्षेपीत केलेल्या उपग्रहांची संख्या ५० झाली आहे.



आजच्या मोहीमेची ठळक वैशिष्टये-
  • ६९० किलोचा भारतीय दूरसंवेदन उपग्रह "कार्टोसॅट-2 ए' अवकाशात
  • 83 किलो वजनाचा "इंडियन मिनी सॅटेलाईट'
  • धृवीय उपग्रह प्रक्षेपकाचे तेरावे यशस्वी उड्डाण
  • दहा उपग्रहांचे पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपण

२०१४ पर्यंत भारत अवकाशात अंतराळवीर धाडेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत. २००८ मध्ये चांद्रयान - १, २०१० मध्ये चांद्रयान - २ च्या मोहीमा आखण्यात आल्या आहेत. लवकरच भारत अवकाशात प्रयोगशाळा उभारेल. भविष्यात चंद्रावरील हक्कासाठी जी युध्दे होतील त्यात भारत नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

Sunday 27 April 2008

वाचनिय लेख

वाचनिय लेख

आजच्या महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणीत मला एक वाचनिय लेख आढळला. तळागाळाशी संपर्क असलेल्या नेत्यांना नेहमी निर्णयप्रक्रियेतून वगळले जाते आणि हा अन्याय असहनिय झाला की बंडाची निशाण फडकवली जाते. राजकारणात गेली कित्येक वर्षे हीच परंपरा कायम आहे. लेख जरुर वाचा.

लोकप्रियता आणि दरबारी राजकारण

- प्रकाश अकोलकर

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2986195.cms

Sunday 20 April 2008

साल २८०८

साल २८०८

स्थान - महाराष्ट्र इतिहास वाहिनी (अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त),
महाराष्ट्र

भाषा - मराठी असेलच असे सांगता येत नाही पण कल्पना करुया.

नमस्कार आपले स्वागत इतिहास २४ तासवर . आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या संशोधकांना २००८ सालातील काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन माणसे क्रिकेट या खेळाची खूप शौकिन होती असे दिसते. आमच्या संशोधकांना काही वृत्तपत्रांची कात्रणे आणि चित्रफिती मिळाल्या आहेत. त्याचे संशोधन चालू आहे. २१०७ च्या दरम्यान पुराखाली दबल्या गेलेल्या एका मोठया शहरात उत्खननात हे पुरावे सापडले. तत्कालीन पुराव्यानुसार क्रिकेट या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा भारतदेशी खेळवली जात असे.

सापडलेले पुरावे अर्धवट स्थितीत असल्यामुळे आणि लिपी अवघड असल्यामुळे पूर्ण माहिती मिळालेली नाही. ह्या स्पर्धेचे नाव आय्.पी.एल्. होते. ली नामक एक खेळाडू पंजाब संघाकडून खेळायचा. हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. यावरुन स्पष्ट होते की लींचे मूळ पंजाबात असावे. तत्कालीन भारत देश हा प्रचंड श्रीमंत देश असावा कारण एका खेळाडूला करोडो रुपये मानधन दिले जात होते. काही खेळाडूंची नावे आमच्या हाती लागली आहेत. यात ब्रेट ली, सचिन, राहूल आणि शाहरुख खान नामक खेळाडूंचा समावेश आहे. हा शाहरुख खान एका संघाचा मालक असूनही १२ वा खेळाडू होता. त्याच्याकडे खेळाडूंना पाणी देण्याचे काम असावे.

मिळालेल्या पुराव्यानुसार असे सिध्द होते की तत्कालीन कलाकार हे उरलेल्या वेळेत क्रिकेट खेळायचे. तत्कालीन क्रिकेटचे सर्वेसर्वा पवार हे व्यक्ती होते. त्यांनीच ह्या स्पर्धेची सुरुवात केली.

वल्हव रे नाकवा हो वल्हव रे रामा

Wednesday 16 April 2008

आद्य समाज सुधारक स्वामी विवेकानंद भाग - १ (धर्मसुधारणा)

धर्मसुधारणा


स्वामी विवेकानंद हे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्म खऱ्या अर्थाने लोकांसमोर मांडला. स्वामी विवेकानंद आपल्या व्याख्यानातून धर्मातील रुढी,भोळसट कल्पना आणि जातियतेवर कठोर टीका करत.विवेकानंदाना इतर धर्मियाविषयी ही आदर होता. खरा हिंदू धर्म आणि त्याचे विचार त्यांनी विदेशात पोहचवले. स्वामींच्या काळात विदेशात हिंदू धर्माचे सुवर्णयुग होते. जगभ्रमण करुन स्वामींनी हिंदू धर्माचा प्रसार केला.

स्वामी गौतम बुध्दांनाही आपले गुरु मानत. त्यांची बौध्द धर्मावरील व्याख्यानेही विषेश गाजली.शिकागो येथे त्यांनी २७ ऑक्टोबर १८९३ ला स्त्रीयांच्या पाक्षिक सभेत बौध्द धर्मावर व्याख्यान दिले होते. त्यांची वाणी रसाळ होती. विदेशी लोक स्वांमींच्या विचारांनी मंत्रमुग्ध होत असत. स्वामींना वेंदान्त तत्वज्ञानाचा पूर्ण आभ्यास होता. त्यांनी केवळ हिंदू धर्माचाच नव्हे तर अन्य धर्मांचाही अभ्यास केला होता. याला पुरावा म्हणजे विवेकानंदानी पुज्यपाद (गुरुना) ७ ऑगस्ट १८८९ लिहिलेले पत्र. या पत्रात विवेकानंद म्हणतात की, "ख्रिस्ती सन्याशाने लिहिलेले ख्रिस्तानुसरण नावाचे पुस्तक आपणास पाठविले आहे.पुस्तक फारच सुंदर आहे.ख्रिस्ती लोकातही त्याग - वैराग्य आणि दास्यभक्ती होती हे पाहून मन विस्मयचकित होते. "

समाजसुधारणेबाबत त्यांची स्पष्ट मते होती.धर्म सोडून केलेली समाजसुधारणा त्यांना पसंत नव्हती. जातियतेवरही ते कठोर टीका करत. समाजसुधारणा करण्याकरीता हिंदूनी धर्म सोडता कामा नये अशी त्यांची धारणा होती. जातिभेद हे धर्माशी निगडीत नसून ती सामाजिक अवनतीसाठी कारणीभूत ठरलेली सामाजिक संस्था होय. अळसिंगा यांना २ नोव्हेंबर १८८३साली लिहिलेल्या पत्रात विवेकानंदानी म्हटले आहे की, "जातिभेद म्हणजे केवळ दृढ्मूल झालेली संस्था होय. तिचे कार्य संपले आहे.भारतीय समाजाची नष्ट झालेली सत्वबुध्दी पुन्हा जागृत करुन जातिभेद दुर करता येइल."

विवेकानंद सांगत की, दुसऱ्याची गुलामी कधीही पत्करु नका . स्वाधीन व्हा. स्वाधीनता हीच उन्नतीची गुरुकिल्ली आहे.स्त्रियांच्या शिक्षणाकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. धर्मप्रसार आणि धर्मसुधारणा ही दोन महत्वाची कार्य स्वामी करत होते.

क्रमशः

संदर्भ - स्वामी विवेकानंद ग्रंथावली - रामकृष्ण मठ

Tuesday 15 April 2008

प्रेक्षणिय स्थळे - मालवण

Monday 14 April 2008

स्वामी विवेकानंद

"दुराग्रह,रक्तपात व पाशवी अत्याचार थांबल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणे शक्य नाही. एकामेकांकडे सहानभुतीने पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोकेच वर काढू शकणार नाही; अत्यंत आवश्यक अशी ही सहान्भुती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानभुतीने पाहणे ही होय "

- स्वामी विवेकानंद
(कुंभकोमण येथिल व्याख्यान)

संदर्भ - तरुणांना आवाहन

पुरोगामी महाराष्ट्र

आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तीन दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जयंती होती. महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीचे दोन महान नेते. आपण दरवर्षी नित्यनेमाने या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, मिरवणुका काढतो आणि बरेच काही.

पण आज महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची स्थिती काय आहे? आज आपला समाज भविष्य, अंधश्रध्दा, बुवाबाजीत फसत चालला आहे. या समाजाला दिशा दाखवणारे प्रभावी समाजसुधारक, पुरोगामी नेतेच नाहीत. जे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांना पुरोगामी शब्दाचा अर्थच माहिती नसेल.

आपले पुरोगामी राजकारणी त्यांच्याबद्दल काय बोलणार?(जुन्या राजकारण्यांचे अपवाद वगळता) ज्या पुण्यात पुरोगाम्यांचे राज्य आहे त्या पुण्यात कोणाकोणाचे सत्कार झाले (सर्वसामान्य जनतेच्या पैशात ) ते आपणा सर्वांस ज्ञात आहे. अर्थात नेत्यांना तरी किती दोष देणार त्यांना निवडून देणार आपणच. जेव्हा आपल्यासारखे बुध्दीवादीच आपली बुध्दी गहाण ठेवतात तेव्हा इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.

गरज आहे ती या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांचे विचार ग्रहण करण्याची. काही लोकांना समाज सुधारलेला अजिबात आवडणार नाही कारण त्यांचा हेतू समाजाला आपल्या गुलामीत ठेवण्याचा असतो. माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे हे विसरुन चालणार नाही. बाहेर जायची गरजच नाही महाराष्ट्रातील संतानी आपल्याला समाज सुधारणेचा,स्वच्छतेचा आणि वैश्विकतेचा उपदेश दिला आहे. तो आपण पाळला तरी पुरेसे आहे.

- वामन परुळेकर



Sunday 13 April 2008

सुप्रसिध्द वाडीचे पेढे , कोल्हापूर

जीवाची बाजी

शुक्रवारी दोघा जोडप्यांना वाचविताना स्वतःचे प्राण देणारा मोहन रेडकर खऱ्या अर्थाने साहसी वीर ठरला. शुक्रवारी मुंबई येथील बॅंडस्टॅंड येथे खडकावर बसलेल्या दोघा जोडप्यांना भरतीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. एका खडकावरुन दुसऱ्या खडकावर असे करत ही जोडपी बरीच पुढे गेली. मात्र थोडया वेळाने भरतीच्या पाण्याने त्यांना वेढले. ही जोडपी मदतीसाठी आक्रोश करु लागली. त्यांचा आक्रोश पाहून त्या मार्गाने जाणारा मोहन जीवाची बाजी लावून पाण्यात गेला. त्याने शर्थीचे प्रयत्न करुन त्या जोडप्यांना वाचविले. पण या प्रयत्नात मोहनने स्वतःचे प्राण गमावले. दुसऱ्याचे प्राण वाचवाणारा मोहन आज आपल्यात नाही. आपल्या आईच्या कानाचे यंत्र आणण्यासाठी मोहन तेथे गेला होता.

मोहनवर त्याच्या गावी मालवणात आज अंत्यसंस्कार होतील. मोहनसारखे शूरवीर फार कमी आहेत. आजकाल दुसऱ्यांचे प्राण घेणारे स्वतःला शूर,धाडसी मानतात. अशा कलीयुगात दुसऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः प्राण देणारे फार कमी. मोहनच्या परीवाराला आधार देण्याचे काम सरकारने आणि समाजाने करावे.

Saturday 12 April 2008

भारत विजयी

दिल्लीत चालू असलेल्या डेविस कप टेनिस स्पर्धेच्या आशियाई गटात भारतीय जोडी लियांडर पेस आणि महेश भूपती यांनी दुहेरीत जपानवर मात करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. काल दोन्ही एकेरी सामने भारताने जिंकले होते. लियांडर आणि महेशने सुरेख खेळ करत पहिला,तिसरा आणि चौथा सेट जिंकला. या विजयाने डेविस चषकातील विजयी परंपरा या जोडीने कायम राखली. डेविस चषकात खेळल्या गेलेल्या २३ दुहेरी सामन्यांपैकी पैकी २१ सामने या जोडीने जिंकले आहेत. भारताने जपानवर ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे.

Friday 11 April 2008

आजचा सुविचार

आजचा सुविचार

एका शतकातील तत्वज्ञान पुढील शतकातील व्यवहारज्ञान बनते.

हेनरी बोचर

-सुविचार संग्रह

Thursday 10 April 2008

रानफुले - चंदन डोंगर

रानफुले
स्थळ - चंदन डोंगर

Coordinates: 15°52'59"N 73°40'55"E

सर्व छायाचित्रे © अंतर्गत सुरक्षित
© वामन परुळेकर





खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?



खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?



सध्या खासगी वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे. खासगी इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्या २४ तास बातम्या देत आहेत. यातील काही वाहिन्या स्वतःला राष्ट्रीय म्हणवून घेतात. पण ज्या वाहिन्यांवर दिल्ली,यु.पी.,बिहार,मुंबई या मर्यादित क्षेत्रातल्या बातम्या दाखवल्या जातात त्या वाहिन्या राष्ट्रीय कशा? या वाहिन्यांवर इतर राज्यांच्या बातम्यांसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ या राज्यांच्या बातम्या तुलनेत फारच कमी दाखवल्या जातात. काही वाहिन्या तर भारतीय सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमा असेच समजून चालतात. कन्नड,तमिळ,तेलगू चित्रपट उद्योग फार मोठा उद्योग आहे. या चित्रपटांच्या बातम्यांना या वाहिन्या फारसे महत्त्व देत नाहीत.

मला असे वाटते की जोपर्यंत या वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणता येणार नाही. या सर्व खासगी राष्ट्रीय वाहिन्यांनी डी.डी.न्यूज या सरकारी राष्ट्रीय वाहिनीकडून आदर्श घ्यावा. डी.डी.न्यूजवर प्रत्येक राज्याच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. स्टेट स्कॅन आणि सीटी स्कॅन न्यूजमध्ये प्रत्येक क्षेत्राला वेळ वाटून दिलेला असतो, त्यावेळेत त्या त्या क्षेत्राच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. खासगी वाहिन्यांनीही प्रत्येक क्षेत्राला ठरावीक हक्काची वेळ उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय वाहिन्या ठरतील.


Wednesday 9 April 2008

आपली माती आपली माणसं

व्यवसायानिमीत्त परप्रांतात जाणाऱ्या या ट्रकचालकाने आपले गाव आपल्या पाठीवर घेतल्यासारखे वाटते....



गजवदना गणेशा मोरया मोरया

टोपणनावे - भाग २

टोपणनावे - भाग २


केशवसुत - कृष्णाजी केशव दामले

केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे

अनिल - आत्माराम रावजी देशपांडे

गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी

कुसमाग्रज - विष्णू वामन शिरवाडकर

बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे


क्रमशः

मराठीतील पहिले

मराठीतील पहिले

पहिले वृत्तपत्र - दर्पण (१८३२)

नाटकाचा पहिला प्रयोग - सीता स्वयंवर (१८६३)

पहिली स्त्री निबंधकार - ताराबाई शिंदे

पहिली मराठी वाहिनी - डी.डी. टेन(सध्याची सह्याद्री )

पहिले मराठी राष्ट्रपती - प्रतिभा पाटील

पहिला मराठी चित्रपट - अयोध्येचा राजा

पहिले मराठी चित्रपट निर्माते - दादासाहेब फाळके

पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट - श्यामची आई

पहिला फिल्मफेअर पुरस्कार विजेता मराठी चित्रपट - माझा होशील का?

पहिले उपलब्ध मराठी वाक्य - श्री चामुंडराये करवियले, श्रीगंगराजे सुत्ताले करवियले [श्रवणबेळगोळ शिलालेख -९०५]

पहिला मराठी ग्रंथ - लिळाचरित्र


(ही माहिती नेटवरुन संकलीत केली आहे, जर चुका आढळल्यास दुरुस्ती सुचवा. धन्यवाद.)

क्रमशः

टोपणनावे

मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे

बरेच मराठी साहित्यिक प्रसिध्द झाले ते त्यांच्या टोपणनावाने. सामान्य मराठी माणसाला ही टोपणनावे परिचीत आहेत पण पूर्ण नावे परिचीत नाहीत. मी काही साहित्यिकांची पूर्ण नावे देत आहे.

दिवाकर - शंकर कशिनाथ गर्गे
यशवंत - यशवंत दिनकर पेंढरकर
दत्त - दत्तात्रय कोंडोघाटे
बी - नारायण मुरलीधर गुप्ते

क्रमशः

Tuesday 8 April 2008

नवी मराठी वृत्तवाहिनी


मराठी वाहिन्यांची संख्या वाढत चालली आहे. सध्या वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे आणि त्यात जर आंतरराष्ट्रीय दर्जाची मराठी वाहिनी सुरु होत असेल तर सोने पे सुहागा. मराठी दैनिक लोकमत आणि नेटवर्क १८ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मराठी वृत्तवाहिनी सुरु होत आहे. या वाहिनीचे नाव आहे IBN-लोकमत. आंतराष्ट्रीय दर्जाची ही वृत्तवाहिनी मराठीतून बातम्या प्रसारीत करेल.

आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिलीच प्रादेशिक वाहिनी ठरणार आहे. भाषा मराठी असली तरी बातम्या जागतिक असतील. तर मराठी प्रेक्षकांनो सज्ज व्हा आणखी एका नवीन मराठी वाहिनीचे कार्यक्रम पहायला.

कणकवलीत कॉंग्रेस विजयी

बहुचर्चित कणकवली नगरपंचायतीचे निकाल आज जाहिर झाले. कॉंग्रेसने सर्वाधिक १० जागा जिंकत राष्ट्रवादीचा पराभव केला. शिवसेनेचा मोठा पराभव झाला. महसूलमंत्री नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मी आज दुपारी कणकवलीत गेलो होतो. कणकवलीला छावणीचे स्वरुप आले होते. दुकाने बंद होती. कडक उन्हाळ्यात कडक पोलीस बंदोबस्त अनुभवायला मिळाला.

पक्षीय बलाबल
कॉंग्रेस - १०
राष्ट्रवादी - ६
अपक्ष- १

आपणही आपले मत नोंदवा.

मराठी समुदाय या ब्लॉगवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार,सर्वाधिक ब्लॉगर्स आणि ब्लॉगच्या वाचकांचे आवडते मराठी दैनिक लोकसत्ता आहे. ५१% मतांसह लोकसत्ता आघाडीवर आहे. ही जनमत चाचणी १ जून २००८ पर्यंत चालू राहील. आपणही आपले मत जरुर नोंदवा.

Monday 7 April 2008

गुढीपाडवा उत्साहात साजरा

Saturday 5 April 2008

नववर्षाच्या शुभेच्छा

नववर्षाच्या शुभेच्छा

सर्व ब्लॉग वाचक आणि चालकांना नववर्षाच्या शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

Friday 4 April 2008

बायचुंग भुतियाची भुमिका योग्यच

बायचुंग भुतियाची भुमिका योग्यच

भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान बायचुंग भुतियाने ऑलिम्पिक दौडीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रीया उमटल्या. भुतियाने आपल्या अंतर्मनाची साद ऐकून हा निर्णय घेतला असावा. मला हा निर्णय योग्य वाटतो. लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार असतो. मग त्याला खेळाडूही अपवाद नसावेत.

काही
लोकांचे असे म्हणणे आहे की, राजकारण आणि खेळ यांना एकत्र आणू नये. मला हे योग्य वाटत नाही. राजकारण हा आपल्या जिवनाचा भाग आहे. जर राजकारणी काही चुकीचे निर्णय घेत असतील तर लोकशाहीत सर्वसामान्य नागरीकच त्यांना विरोध करतात. उदा. टॅक्सीचालक सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात टॅक्सी बंद ठेवतात,बॅंकवाले बॅंक बंद ठेवतात. गांधीजींनीच आपल्याला सविनय कायदेभंगाचा मार्ग दाखवला होता. तर मग आता सांगा , चीनच्या अन्यायी धोरणाचा निषेध करण्यासाठी बायचुंगने घेतलेला निर्णय अयोग्य कसा?

गेली
कित्येक वर्षे तिबेटी बौध्द जनतेवर चीनी राज्यकर्ते राज्य करत आहेत. तिबेटी जनतेची स्वतंत्र राष्ट्राची मागणी चीनने नेहमीच फेटाळून लावली. आता तर तिबेटी जनतेचा विरोध मोडून काढून,चीन ऑलिम्पिक ज्योत तिबेटमधून एवरेस्टवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. ऑलिम्पिक शांततेसाठी खेळवले जाते असे काहींचे म्हणणे आहे. जर असे असेल
तर
हिंसा करुन ऑलिम्पिक ज्योत तिबेटमध्ये नेण्याचे प्रयत्न का चालू आहेत? बायचुंगला विरोध करणाऱ्यांनी याचा जरुर विचार करावा.

- वा.रा.परुळेकर

Tuesday 1 April 2008

आजचा सुविचार

आजचा सुविचार

चुकणे हा मनुष्याचा गुणधर्म आहे.

- अनामिक

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters