लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर
आज क्रांतीकारक आणि महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांची जयंती आहे. बाराव्या शतकात या महान विचारवंताने जी क्रांती केली त्याची दखल जगभरात घेतली गेली. लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक असलेले बसवेश्वर समता वादी होते. तत्कालीन सनातनी हिंदू धर्मावर बसवेश्वरांनी आसूड ओढले. अंधश्रद्धेने ग्रस्त झालेल्या तत्कालीन समाजाला पुनर्जिवन देण्याचे काम महात्मा बसवेश्वर यांनी केले.
संत बसवेश्वर यांचा जन्म इ.स.११३२ मध्ये कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे वै. शु. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे बसवेश्वरांना लहानपणापासून समाजातील असमानतेबद्दल प्रचंड चीड होती. दलितांवर हिंदू उच्चवर्णींयांकडून होणारे अत्याचार बसवेश्वरांना सहन होत नव्हते म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली मुंज करून घेण्यास स्पष्ट नकार दिला व आपल्या पालकांना अट घातली की जर दलितांची, शूद्रांची मुंज होत असेल तरच मी माझी मुंज होऊ देईन. एवढ्या लहान वयात बसवेश्वरांनी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते. सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता. मी जेव्हा जेव्हा संत बसवेश्वरांच चरित्र वाचतो तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. शेकडो वर्षापूर्वी ज्याकाळी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा प्रचंड पगडा जनमानसावर होता. शूद्रांवर अनन्वीत अत्याचार होत होते. त्याकाळात बसवेश्वरांनी जे धाडस केल त्याने मी पूर्ण प्रभावित झालोय. एक व्यक्ती या सर्वांविरुद्ध उभा राहतोय आणि एक यशस्वी लढा देतोय ह्याची कल्पनाही करवत नाही. संत बसवेश्वरांनी जे काही कार्य केले ते कार्य सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवलेला इतिहास झालाय. अवघ्या ३५ वर्षाच आयुष्य (११३२ ते ११६७) आणि या अल्प आयुष्यात बसवेश्वरांनी बहुजन जनतेसाठी प्रचंड कार्य केले. माणूस आणि माणुसकी हा बसवेश्वरांचा मूलमंत्र होता. त्यांनी अस्पृश्यता, जातीयवाद, कर्मकांड, अनेक देवतावाद, स्त्री – पुरुष भेदाभेद ह्या विरुद्ध लढा दिला.
११४१ मध्ये बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’ या पहील्या लोकशाही संसदेची स्थापना केली. या संसदेची रचना समाजातील सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी होती. पहिल्या संसदेत मांग, महार, शिंपी, बहुरूपी, मेंढपाळ, धनगर, धोबी, कोळी, शेतकरी, न्हावी, गुराखी, महिला असे सर्व समाजाचे प्रतिनिधी सामील झाले. जातीयता नष्ट करणे हे संत बसवेश्वरांचे पहिले उद्दिष्ट होते. या संसदेत स्त्रीयांसाठी विशेष आरक्षण होते. संत बसवेश्वरांनी विधवापुनर्विवाहास पूर्ण मान्यता दिली त्याचवेळी बालविवाहास विरोध केला. शेकडो वर्षापूर्वी जातीयता नष्ट करण्यासाठी संत बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. एवढ करून ते थांबले नाहीत. त्यांनी स्वत: अनुभव मंडप संसदेत एका ब्राम्हण मुलीचा विवाह एका अस्पृश्य मुलाशी करून आंतरजातीय विवाहाची मुहूर्तमेढ रोवली. ते अनेक वेळा अस्पृश्यांच्या घरी जेवण करत असत. अस्पृश्यांना स्वत:च्या घरी मुक्त प्रवेश देत असत.
बसवेश्वर यांच्या यां कार्यामुळे तत्कालीन धर्म कट्टरवादी चिडले. बसवेश्वराना बहिष्कृत करण्यात आले. त्यांना पंतप्रधान पद सोडाव लागले. अनेक भ्रष्टाचाराचे खोटे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. चौकशी अंती त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला आणि संत बसवेश्वरांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. बसवेश्वर यांची अनुभव मंडप ही संसद भारतात लोकप्रिय होत गेली. अनेक लोक या क्रांतीत सहभागी झाले. मंडपात येणाऱ्या मागासवर्गीय लोकांनाही बसवेश्वरांनी देवाच्या पूजेचा आणि धार्मिक शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यासाठी बसवेश्वर यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी सुतक आणि विटाळ यां प्रथा नाकारल्या. वेश्या आणि विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. स्त्रीयांसाठी साक्षरता केंदांची निर्मिती संत बसवेश्वर यांनीच केली. परिश्रम हीच खरी पूजा असे संत बसवेश्वरांना वाटायचे. त्यामुळे कष्टाचे महत्व त्यांनी सामान्य जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
संत बसवेश्वर यांनी जातीयता मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाराव्या शतकात जातीयतेची निरर्थकता समाजाला पटवून दिली. सनातनी धर्मांध लोकांकडून हीन वागणूक मिळूनही बसवेश्वर खचले नाहीत. ईश्वरप्राप्ती साठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हाच संदेश बसवेश्वर यांनी दिला. व्यक्तीच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून त्याची ओळख निर्माण होते हे बाराव्या शतकात लोकांना पटवून देणे सोप नव्हत पण बसवेश्वरांनी ते साध्य केल. संत बसवेश्वरांकडे प्रचंड दूरदृष्टी होती. संपत्तीचे योग्य वाटप कसे व्हावे, स्त्रियांना कसे योग्य स्थान दिले जावे, जातीभेद कसा नष्ट केला जावा या आणि अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी अनुभव मंडपात मार्गदर्शन केले. आजही बसवेश्वरांनी दिलेल्या शिकवणीची समस्त मानवी समाजास गरज आहे. भारतीय समाजात क्रांतीच बीज पुरणारया या महामानवास विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment