काही दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय.
गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे.
२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्रॉन जेटी, वेळणेश्वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.
८००० वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची.