Friday, 30 May 2008
हास्य-विनोद
विश्वासाची माती???
विश्वासाची माती ???
गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग अन्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?
राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.
पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.
Wednesday, 14 May 2008
नागरी सुरक्षा
जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी
- तुमच्या दुकानात किंवा परीसरात येणाऱ्या प्रत्येक बॉक्स,पॅक,बॅगची कठोर तपासणी करा.
- एकांतात ठेवलेली आणि संशयित वाटणारी पॅकेजीस,बॅग्जबद्दल ताबडतोब जवळच्या पोलिस स्थानकास माहिती द्या.
- आपल्या दुकान किंवा घराच्या परीसरात एखादी अनोळखी वा संशयित व्यक्ती फिरत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
- मालक नसलेल्या गिफ्ट बॉक्स, खेळणी यांना हात लावू नका.
- तुमच्या परीसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासून पहा.
- जागा भाडयाने देताना त्या व्यक्तिची ओळख तपासून पहा. त्यासंबंधीत कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा.
आणिबाणीच्या काळात प्रशासनाशी सहकार्य करा आणि शांतता राखा.
हास्य-विनोद
टिचर- गणेश तूला एवढा उशिर का झाला?
गणेश- मॅडम त्या बोर्डमुळे मला उशिर झाला।
टिचर- कोणत्या बोर्डमुळे.
गणेश- मॅडम रस्त्यावर लावलेला तो बोर्ड मी वाचला. त्यावर स्पष्ट शब्दात लिहीले होते "पुढे शाळा आहे, सावकाश जा."
