Monday, 23 June 2008

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

लोकशाही देशात प्रत्येक व्यक्तीला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दीले आहे. अगदी सामान्य माणसाला त्याची मते मांडण्याचा अधिकार फक्त लोकशाहीत मिळतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलेली लोकशाही लोकशाही नव्हेच. मित्रांनो आपल्या या सर्वात मोठया लोकशाही देशात अजूनही लोकशाही रुजलेली नाही. लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. पण विचार करायची क्षमता नसलेले लोक हिंसेने प्रत्युत्तर देतात तिथेच लोकशाही पायदळी तुडवली जाते. जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही हुकूमशाही असलेला देश यशस्वी होवू शकला नाही. लोकशाहीत लोकांच्या मतांना विचारात घेणे गरजेचे असते पण जमावाची मते विचारात घेतली तर लोकशाही फसू शकते. कारण जमावाला विचार करण्याची शक्ती नसते. जमाव भावनेच्या भरात कृती करत असतो आणि या जामावाचे फायदे घेणारे स्वार्थी असतात.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी हा शब्दच सरकार किंवा एखाद्या समुहाकडून उच्चारला जाणे अभिप्रेत नसते. आता प्रश्न उठतो की जर कोणी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला तर काय करायचे? सध्या आपण बघतच असाल की दूरचित्रवाहिन्या कशा स्वरुपाच्या बातम्या प्रसारीत करीत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमात दाखवली जाणारी भारतीय संस्कृती कोणी परदेशी व्यक्तीने पाहिली तर त्याचा मोठा गैरसमज व्हायचा. त्याला वाटायचे की भारतीय कुटुंबातील स्त्रीया ह्या स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांच्या सुपाऱ्या देतात. सासूचा जन्म हा आपल्या सूनेला छळण्यासाठी झाला असावा. या मालिकांमधिल विवाहपूर्व आणि विवाहानंतरचे संबंध पाहिले तर या परदेशी व्यक्तीला आपण कुठे तरी मागे पडतोय ही भावना स्वस्थ बसू देणार नाही.
वृत्तवाहिन्यांनी तर ताळतंत्रच सोडलय. चांगल्या बातम्या तर सोडाच खऱ्या बातम्या मिळतील याचीही खात्री नाही. या वाहिन्यांना कोणतीही आचारसंहिता नाही. चांगल्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी बीबीसी आणि दूरदर्शन हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.

by Vikram Nandwani Sir
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही महत्त्वाची आहे. जबाबदारी सर्वांनाच लागू होते. वृत्तपत्रे,दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ब्लॉगर्स या सर्वांनाच जबाबदारी लागू होते. पण ही जबाबदारी स्वतःहून स्विकारलेली असणे आवश्यक आहे. दुसऱ्यांनी ती जबरदस्तीने लादणे आभिप्रेत नाही. काय लिहावे आणि काय प्रसारीत करावे याची एक नियमावली प्रत्येकाने स्वतः तयार करणे आवश्यक आहे. भारतीय दूरचित्रवाणी अथवा वृत्तपत्रे अशा स्वतः ठरविलेल्या नियमावलीचे कठोर पालन करताना दिसत नाहीत. पण ब्रिटनमधील वृत्तपत्रे कठोरपणे आचारसंहितेचे पालन करतात. त्यासाठी त्यांनी प्रेस कंप्लेंन्ट कमिशन ची स्थापना केली आहे. भविष्यात ब्लॉग्ज हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास येणार आहे. मराठी ब्लॉगींग विश्व हे अजून बाल्यावस्थेत असले तरी हे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. तेव्हा या माध्यमावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतानाच जबाबदाऱ्या पाळणे गरजेचे ठरणार आहे. या जबाबदाऱ्या स्वतःच ठरवलेल्या असाव्यात उदा.

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता-

ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.

दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.

ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.

ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करण्यात येणार नाही.

या ब्लॉगमध्ये कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती या ब्लॉगवरुन प्रसारीत केली जाणार नाही.

राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण या ब्लॉगमधून होणार नाही.

ही आचारसंहिता माझ्या अन्य ब्लॉग्जलाही लागू आहे. कालानुरुपे या आचारसंहितेत नवीन कलमे लिहीली जातील.

3 comments:

Anonymous said...

mala vatat ki konatyahi code chi garaj naahi ...

Anonymous said...

he mhanaje swatachyaa payaat swatach sakhali badhanyasarakhe jale..lokshahi mhanata tar yachi garaja kay ???

Waman Parulekar said...

अभिव्यक्तीबरोबर जबाबदाऱ्या पाळल्याच पाहिजेत. तरच आपण लोकशाहीचे जबाबदार नागरिक होवू.

ShareThis

Visitors Worldwide

free counters