Friday, 25 January 2013

लिंगायत धर्म - मानवतावादी महान धर्म

लिंगायत धर्म - मानवतावादी महान धर्म

मी माझ्या मागच्या लेखात भगवान बसवेश्वर आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिली होती. भारत देश हा अनेक संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, विचारधारा यांना सामावून घेणारा एक विशाल देश आहे. याच महान परंपरेत भगवान बसवेश्वर यांच नाव येत. १२ शतकात बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. बसवेश्वरांचा उद्देश फार स्पष्ट होता. रुढी आणि परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समजाला मार्ग दाखवण. स्त्री - पुरुष समानता निर्माण करण. जातीयवाद नष्ट करण. समाजात समानता प्रस्थापित करण. जन्मधीष्टीत वर्चस्ववादाला रोखण. सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता.

लिंगायत धर्मामध्ये सर्व समान आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. जो शिकेल तो सन्मान प्राप्त करेल, अशी साधी शिकवण आहे. कोणीही लिंगायत होवू शकतो. लिंगायत धर्म स्वीकारू शकतो. त्याची जात आणि धर्म महत्वाचा नाही. 'इष्टलिंग दीक्षा' प्राप्त करून लिंगायत धर्म स्वीकारला जावू शकतो. जे जन्मापासूनच लिंगायत असतात त्यांना वयाच्या १२-१३ वर्षी 'इष्टलिंग दीक्षा' दिली जाते.

लिंगायत धर्मामध्ये 'अनुभव मंडप' ही सर्वोच्च संसद आहे. ही संसद लोकशाही देशातील संसदीय प्रणाली सारखीच असते. विद्वान लोक ज्यांना लिंगायत धर्माच्या विचारांचे योग्य ज्ञान असते त्यांना सदस्य केले जाते. हे सदस्य समाजातील कोणत्याही थरातील असू शकतात. गरीब - श्रीमंत हा भेद इथे नाही. लिंगायत धर्म वर्णव्यवस्थेला नाकारतो. बसवेश्वर वर्णव्यवस्था नाकारताना सांगतात की ती मानवनिर्मित आहे. ईश्वराने निर्माण केलेली नाही.       

बसवेश्वरांचा मार्ग खडतर होता. त्यांनी सुरु केलेली धर्मसुधारणा जातीयवादी कट्टर धर्मांधांना अजिबात आवडली नव्हती. बसवेश्वर सर्व जातींना समान वागणूक द्यायचे हे कट्टरवादी धर्मधुरीणांना खटकले. बसवेश्वरांच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाहांना सुरुवात झाली. पहिला आंतरजातीय विवाह झाला. शरण मधुवारस आणि शरण हरलाय्या या दोन कुटुंबात पहिल्या प्रथम बसवेश्वरांनी रोटी बेटी व्यवहार घडवून आणला. ह्या प्रकारने सनातनी चिडले. त्यांनी राजाकडे बसवेश्वरांची तक्रार केली. बसवेश्वरांना शिक्षा म्हणून बिदर सोडण्याचा आदेश देण्यात आला. शिक्षा म्हणून मधुवारस, हर्लाय्या आणि शीलवंता (वधू) ह्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. तिघांचे डोळे काढून घेण्यात आले. पाय हत्तीच्या पायांना बांधून फरपटत नेण्यात आल. हाल हाल करण्यात आले. पण ह्या तिघांच बलिदान वाया नाही गेल. बसवेश्वरांनी सनातनी लोकांविरुद्ध आपला लढा चालूच ठेवला.

१२ व्या शतकात उदारमतवादी विचार भारतभूमीला देणारे बसवेश्वर हे श्रेष्ठ संत ठरतात. 'मनुष्याची योग्यता जन्मावर आधारीत नसून, केवळ चांगले चरित्र, गुण आणि शिक्षण माणसाला श्रेष्ठ बनवत' हे त्यांचे विचार भारताच्या भविष्यातील वाटचालीत उपयोगी ठरतील. समाजातील प्रत्येक व्यक्ती एकसमान आहे. स्त्री पूरुष भेद निरर्थक आहे. हे विचार आजही लागू होतात. बसवेश्वरांनी दाखवलेला मार्ग आज अनेकजण विसरले आहे. अज्ञानही आहे. आजही जातीयवाद आहे, आजही स्त्रीला समान हक्क मिळत नाहीत. स्त्रीने चूल मूल सांभाळावे या विचाराचे अनेकजण आहेत. निरर्थक रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धा आजही आहेत. या आधुनिक काळातही १२ व्या शतकातील बसवेश्वरांच्या विचारांची गरज आहे.

धन्यवाद - वामन परुळेकर    

ShareThis

Visitors Worldwide

free counters