Thursday, 19 June 2008

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?


आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters