विश्वासाची माती ???
गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग अन्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?
राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.
पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.
No comments:
Post a Comment