सौरभ सहारनपूरच्या सिमेवर उभा होता. सहारनपूर शत्रूसैन्याच्या हल्ल्यात बेचिराख झालेले शहर. सौरभ कसाबसा या शहरातून निसटला होता. त्याचे प्राण वाचले होते पण तो निराश होता. या हल्ल्याच्यावेळी तो काहीच करु शकला नव्हता. शत्रु देशाची विशाल सेना त्याच्या गावावर तुटून पडली होती. माणुसकीचा गंधही नसलेल्या या हैवानांनी त्याच्या गावाचे स्मशाण केले होते.
गेले तीन दिवस सौरभ उपाशीपोटी आपले प्राण वाचवत जंगलातून फिरतोय. उंच डोंगरावरुन त्याला गावातील दृश्य दिसत होते. सगळीकडे आगीचे लोट. शत्रु सैन्य माघारी फिरले तसा सौरभ गावाकडे वळला. दबक्या पाउलांनी त्याने गावात प्रवेश केला. काहीच शिल्लक नव्हते. सैतानांनी सर्वाना मारले होते. एखादा चुकून जिवंत राहीला असेल तर त्याला मरेपर्यंत भाला खूपसून मारण्यात आले होते. आपल्या गावाची स्थिती पाहून सौरभ कोसळलाच.
हे सगळे का आणि कशासाठी ? जमिनीच्या टीचभर तुकडयासाठी.
राज्याच्या सीमेचा वाद राजांचा त्यात आमचे काय चुकले? सौरभ स्वतःशीच बडबडत होता.
माझ्या गोरगरीब गावकऱ्यांनी काय पाप केले होते? सौरभ आक्रोश करत खाली पडला.
एव्हाना राजाला हल्ल्याची बातमी कळली. त्याने आपल्या सेनेला बदला घेण्याचे निर्देश दिले. आता शत्रु पक्षातील एखादे गाव असेच जळणार आणि सुडाची ही साखळी अशीच सुरु राहणार.
- वामन परुळेकर
No comments:
Post a Comment