Friday, 28 March 2008

वाचनीय लेख

वाचनीय लेख

आज सर्फींग करता करता मला हा लेख सापडला. नंदकुमार सोमण यांनी हा लेख दै.पुढारीसाठी लिहीला आहे. लेखाचे नाव आहे .... तेथे कर माझे जुळती..

लेख वाचण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा

> http://pudhari.com/SindhuDurgStanikDetailNews.aspx?news_id=39274

जरुर वाचा.

Thursday, 27 March 2008

गणराज रंगी नाचतो.....

चांगली सुरुवातआज दिवस अखेर भारताने एकही गडी न गमावता २१ षटकात ८२ धावा केल्या. द.आफ्रिकेच्या ५४० या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने आज चांगली धावगती राखली. विरेंद्र सेहवागने आज आपले या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. दिवस अखेर तो ५२ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूने जाफरने त्याला चांगली साथ दिली. त्याने २५ धावा फटकावल्या.

तत्पूर्वी द.आफ्रिकेने ५४० धावांचा डोंगर उभा केला. हरभजन सिंग ने ५ बळी मिळवले. भारतीय गोलंदाजानी ऑस्ट्रेलियात चांगली कामगीरी करुन देखील अशी खेळपट्टी का बनवली गेली हा प्रश्न मला पडलाय. खेळपट्टीमध्ये जानच दिसत नाही. गोलंदाजांना या खेळपट्टीचा कोणताच फायदा होत नाही आहे. आणखी एक पाटा खेळपट्टी.

उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात द्यायला हवी. तरच आपण तग धरु शकू.

- वामन परुळेकर

Wednesday, 26 March 2008

आत्महत्या चालूच

आत्महत्या चालूच

अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.

सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.

गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.

"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."

- वामन परुळेकर

Tuesday, 25 March 2008

श्री स्वामी समर्थ मंदीर, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ मंदीर, अक्कलकोट

आजचा सुविचार

आजचा सुविचार

ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी दुसऱ्याला दिल्याने वाढते.

- अनामिक

पेन्सिल स्केच

पेन्सिल स्केच
रविंद्र केरकर आणि अमित सावंत यांची पेन्सिल स्केच.

1) रविंद्र केरकर यांनी रेखाटलेल स्केच2) अमित सावंत यांनी रेखाटलेल स्केच


3) रविंद्र केरकर यांनी रेखाटलेल स्केच


Monday, 24 March 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ५ (पु.ल.देशपांडे)

माहितीपर संकेतस्थळे भाग - (पु..देशपांडे)

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील पाचवे पुष्प आहे..> http://www.4shared.com/dir/3765608/8238f1b4/Pu_la_Deshpande.html

या माहितीस्थळावरुन आपण पु.लं.ची पुस्तके आणि त्यांचे साहित्य मिळवू शकता.

( क्रमशः )

आज शिवजयंती [तिथीप्रमाणे]

आज शिवजयंती [तिथीप्रमाणे] . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया धृ

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय का गेला ॥१॥

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥

- स्वा.वी. विनायक दामोदर सावरकर

Sunday, 23 March 2008

आजचा सुविचार

आजचा सुविचार

आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला देणे हिच खरी सेवा आहे.

भावपूर्ण श्रध्दांजली

भावपूर्ण श्रध्दांजली

मराठी अभिनेते गणपत पाटील यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी ६० मराठी चित्रपटांत काम केले होते. त्यांचे तमाशाप्रधान चित्रपट फार गाजले. सोंगाडया,लावण्यवती अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भुमिका केली होती. गेली चार दशके त्यांनी मराठी चित्रपट उद्योगात आपले योगदान दिले होते.

गणपत पाटील यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली

आमीर खानचा नवा लूक

आमीर खानचा नवा लूक

हिंदी चित्रपट अभिनेता आमीर खान काल रेस चित्रपटाच्या प्रिमियर साठी आला होता. त्यावेळी त्याच्या नविन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमीरने लष्करी टाइप हेअरकट ठेवला आहे. हा नवा लूक त्याने आपल्या आगामी चित्रपट "गझनी" साठी ठेवला आहे. गझनीची कथा मूळ दक्षिणी चित्रपटाची आहे. गझनी अमिरचे घरचे निर्माण आहे. तर लवकरच आपल्या सर्वांना एक दर्जेदार चित्रपट पहायला मिळेल.


Saturday, 22 March 2008

नभ मेघांनी आक्रमिले

नभ मेघांनी आक्रमिले
काल अचानक आलेला थंड पाऊस सुखाऊन गेला. उकाडयाने हैराण झालेल्या आम जनतेला दिलासा मिळाला.


होळी चे बळी

होळी चे बळी

काल लोकलमध्ये घडलेली घटना वाचली आणि अंगावर शहारा उभा राहीला. केमिकलमिश्रीत रंगाचा फुगा बसून पुनीत नामक एका तरुणाचा एक डोळा निकामी झाला आहे. केमिकलयुक्त रंग केवळ डोळ्यांनाच नव्हे तर संपूर्ण मानवी शरीराला धोकादायक मानला जातो. डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव त्याची हानी झाली तर संपूर्ण आयुष्य अंधारात घालवावे लागेल. त्यामुळे रंग उधळताना तो रंग केमिकलयुक्त तर नाही ना याची खात्री करुन घ्यावी.

खरे तर असे घृणास्पद प्रकार दरवर्षी घडत असतात . फक्त त्यांचे स्वरुप वेगवेगळे असते. एखाद्याच्या इच्छेविरुध्द रंगवणे हा सुध्दा गुन्हाच आहे. अनोळखी ठिकाणी कोणता रंग वापरला आहे हे आपल्याला माहिती नसते. तेथे धोका अधिक असतो. होळीच्या निमित्ताने काही समाजकंटक वाहनधारकांना रस्त्यावर अडवून लुटतात. कधी स्त्रियांवर,कॉलेजकुमारींवर त्यांच्या इच्छेविरुध्द रंग उधळले जातात. हे सर्व गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि त्यासाठी सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे.


चला केमिकलमुक्त रंगांचा वापर करुया. एखाद्याच्या इच्छेविरुध्द रंगवणे बंद करुया.

होळीच्या शुभेच्छा

माझ्या आवडत्या मराठी कविता

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा

जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा

स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा

--- शांता शेळके

आजचा सुविचार

आजचा सुविचार

सदैव भूतकाळात रमणाऱ्यांना भविष्य नसते.

- म.टा.

Friday, 21 March 2008

होळी

सर्वांना होळीच्या शुभेच्छा.


विजयदुर्ग सफरमुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे

>महादरवाजा
>तोफखाना
>दारुभंडार
>भुयारी मार्ग
>सदाशिव बुरुज
>खलबतखाना
>अश्वशाळा
>सदर
>गोविंद बुरुज
>चोरदरवाजा


- वामन परुळेकर

Thursday, 20 March 2008

दिल्ली लुटली

दिल्लीचा पाडाव
१७३९ साली आजच्याच दिवशी नादिरशहाने दिल्ली वर कब्जा केला आणि दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटली आणि इराणला पाठविली. मोठया स्वरुपात भरुन येणारी वित्तहानी झाली. हे मयुरासन सतराव्या शतकात मुघल बादशाह शाहजहान साठी तयार करण्यात आले होते. हे रत्नजडीत मयुरासन दिवान--आम मध्ये ठेवण्यात आले होते. या मयुरासनाची तत्कालिन किंमत करोड ते १० करोडच्या दरम्यान होती. दिल्लीचा पाडाव झाल्यानंतर नादिरशह मे १७३९ला परत निघाला. फेब्रुवारी १७३९ ते मे १७३९ दरम्यान तो भारतात होता.

मयुरासन

नादिरशहा हा इराणी साम्राज्याचा पाया होता. काही इतिहासकार त्याची तुलना नेपोलिअनशी करत असत. त्याने बलाढय साम्राज्य उभे केले होते. १७३८ च्या अखेरपर्यंत हे साम्राज्य कंदहार पर्यंत पसरले होते. नादिरशाहचा डोळा मुघल हिंदुस्थानवर होता. काबूल,गजनी करत नादिरची विशाल सेना लाहोरला पोचली. हिच योग्य वेळ आहे हे नादिरने ओळखले होते. मराठा साम्राज्याने मुघल साम्राज्याला खिळखिळे केले होते. अशा स्थितीत मुघलांचा पाडाव शक्य होता. फेब्रुवारी १७३९ ला कर्नाल मध्ये मुघलांचा पाडाव झाला. मोहम्मद शाहला अटक झाली. नादिरच्या सेनेने दिल्लीत प्रवेश केला. मुघल बादशाह अटकेत गेल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. बदला म्हणुन काही भारतीय राजांनी पर्शियन सेनेवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. नादिरला हे कळले, तेव्हा त्याने आपल्य सेनेला बदला घ्यायचा हूकुम दिला. २२ मार्च १७३९ तो काळा दिवस दिल्लीत बदल्यापोटी एका दिवशी २०००० ते ३०००० लोकांची हत्त्या झाली. मुघल बादशहा मोहम्मद शहा ने नादिरची माफी मागितली. नादिरने सैन्याला थांबण्याचे आदेश दिले.

बदल्यात बादशहाने शाही खजान्याच्या चाव्या नादिरकडे सुपूर्द केल्या. नादिरने मयुरासन,कोहीनूर,दर्यानूर,असंख्य रत्ने लुटली. मे १७३९ ला नादिर इराणकडे निघाला तेव्हा त्याच्या बरोबर हजारो हत्ती,घोडे आणि उंट होते. लुटीचा माल एवढा होता की इराण मध्ये तीन वर्षे सर्व कर माफ होते.

संदर्भ
-
द ज्वेल्स ऑफ इराण -- http://www.geocities.com/Pentagon/Base/1406/jewel/imperialjewels.html

नादिर साम्राज्य -
http://www.angelfire.com/empire/imperialiran/golestan.html

Wednesday, 19 March 2008

फुलपाकळी छान किती दिसते......

फुलपाकळी छान किती दिसते......


सीतारा

(परवाच आमच्या देशमुख सरांनी आम्हाला एका बंगाली चित्रपटाची कथा सांगितली. कथेचा लेखक कोण ते माहिती नाही पण लेखक नक्कीच महान असेल. सरांनी सांगितलेली ती कथा मी माझ्या शब्दात येथे लिहीत आहे. सरांनी आम्हाला कथा इंग्रजीतून ऐकवली. त्याचा मराठी अनुवाद मी करत आहे. )

तर या बंगाली चित्रपटाचा नायक एक टांगेवाला असतो. त्याचे नाव अब्दुल्ला असते. हा अब्दुल्ला म्हणजे अगदीच एकटा माणूस. नेहमीच एकांतात राहणारा. फारसा कोणाशी संबंध नाही. आपले काम आणि आपण हाच त्याचा नित्यक्रम असतो. अब्दुल्ला अगदी प्रामाणिक मनुष्य असतो.

तर या अब्दुल्लाचे लग्न ठरते. मुलगी एका खेडेगावातली असते. अब्दुल्ला कडून फार कमी माणसे लग्नास येतात.
अब्दुल्ला फुलांनी सजवलेल्या खुर्चीवर बसलेला असतो,तेवढयात एक छोटी मुलगी अब्दुल्ला जवळ येते.

"तो आप ही है, जो मेरी बहेन को मुझसे दुर ले जाने आये है। "
"हा बेटा. मै तुम्हारे बहेन से शादी करने आया हूँ "
एवढे ऐकून ती मुलगी पळून जाते.

ती छोटी मुलगी म्हणजे सीतारा. तिचा आपल्या बहिणीवर फार जीव असतो. ती आपल्या बहिणीशिवाय रहायला तयार नसते. विदाइच्या वेळी सीतारा रडून रडून बेजार होते. तिची ती स्थिती बघून अब्दुल्ला आपल्या बीबीला म्हणतो,
"उसे भी अपने साथ ले लो, वो तुम्हारे बिना नही जी सकेगी| "

अशा तऱ्हेने अब्दुल्लाच्या घरी आता दोन माणस रहायला आली. सीतारा पाचवीत शिकायची. रोज शाळेत जायची. अब्दुल्ला बरोबर तिचे आता फारच चांगले जमायचे. अब्दुल्ला तिला शाळेत सोडायचा. घरी आल्यावर तोच तिचा अभ्यास घ्यायचा. सीताराही अब्दुल्लाला शाळेतल्या, मैत्रिणींच्या गोष्टी सांगायची. सीतारा आता अब्दुल्लाच्या घरी फार रमली होती.

अब्दुल्ला रोज रविवारी सीताराला बाहेर फिरायला न्यायचा. भेळपुरी,आईसक्रिम,फुगे घेउन द्यायचा.
एका रविवारी अब्दुल्ला आणि सीतारा बाहेर फिरायला गेले होते. अब्दुल्ला टांगा चालवत होता. एवढयात ट्राफीकमुळे एका दुकानासमोर टांगा थांबला. त्या दुकानात एक सुंदर निळा फ्रॉक टांगलेला होता. सीताराला तो फार आवडला.
"चाचा वो फ्रॉक मुझे चाहिये"
अब्दुल्लाने दुकानाकडे पाहिले आणि लगेच तो म्हणाला
"सीतारा वो बंदर तो देख कितना उछल रहा है। चल उसे देखते है।"

सीतारा हिरमुसली. संध्याकाळी अब्दुल्लाने सीताराला घरी सोडले आणि तो पुन्हा बाहेर पडला. तो तडक त्या दुकानात गेला आणि दुकानदाराला फ्रॉकची किंमत विचारली.
"300 रुपये साहेब"
अब्दुल्ला खिन्न चेहऱ्याने बाहेर आला. एवढे पैसे कुठून आणणार हाच प्रश्न त्याला सतावत होता. आपल्या एका आठवडयाची कमाई पण एवढी होत नाही हे त्याच्या लक्षात आले. पण त्याच वेळी अब्दुल्लाने एक निश्चय केला. आता तो दुपारची चहा आणि वीडी टाळू लागला. जास्तीत जास्त काम करु लागला.

एका दुपारी तो घरी आला. तेव्हा त्याला कळले की, बायकोच्या घरुन तार आली आहे. वडील आजारी आहेत आणि त्या दोघींना जावे लागणार आहे. सीतारा रडू लागली पण त्यांचा नाईलाज होता. अब्दुल्ला त्यांना रेल्वेत बसवून आला. त्याच्या डोळ्यासमोर सीताराचा रडका आणि बावलेला चेहरा येत होता.

सकाळ उजाडली. अब्दुल्ला घाईघाईने कामावर गेला. आता जास्त कमवायचे. रात्री घरी कोणी वाट पहाणारे नाही, तेव्हा जास्त कष्ट करायचे त्याने मनोमनी ठरवले. त्याला तो फ्रॉक घ्यायचा होता आणि सीताराच्या चेहऱ्यावरचे हास्य पहायचे होते.

त्याच दिवशी दुपारी अब्दुल्लाला एक तार मिळाली. त्यात लिहीले होते की, "सीतारा आजारी आहे. आपण ताबडतोब यावे." अब्दुल्लाने विचार केला, आपण स्वतः गेलो तर खर्च जास्त होईल. त्याऐवजी पैसे पाठवले तर उपचार तरी होतील. त्याने 100 रु. मनीऑर्डर केली.

आता अब्दुल्ला जास्त कष्ट करत होता कारण हातातले पैसे तर संपले होते.
दुसऱ्या दिवशी दुपारी अब्दुल्ला घरी परतला तर त्याला दरवाजा उघडा दिसला. अब्दुल्ला आनंदला. सीतारा आली असेल. तो खुशीत होता.

तो घरात आला. सगळीकडे अंधार होता. त्याने बायकोला हाक दिली. आतल्या खोलीत बायको बसली होती.
"अरे तुम अकेली ही आयी हो। सीतारा कहा है?"

त्याचे वाक्य संपताच बायकोने हंबरडा फोडला. अब्दुल्ला स्तब्ध उभा होता. त्याला काहीच कळत नव्हते.
"क्या हुआ उसे? बताती क्यो नही?"

"क्या हुआ? अब पुछ रहे हो? बच्ची चाचा चाचा करते मर गयी। लेकीन तुम उसे देखने भी नही आये। शैतान हो तुम "

अब्दुल्लावर डोंगरच कोसळला. त्याला काहीच सुचेना. तो बाहेर गेला. पण तो पुर्ण स्तब्ध होता. बाहेर जोराचा पाउस पडत होता. विजा कडाडत होत्या. अब्दुल्ला तसाच भिजत उभा होता.

काही दिवसानंतर अब्दुल्ला पुन्हा कामावर जाउ लागला पण घरी बसाव लागत म्हणून. त्याला आता कष्ट करण्याची अजिबात ईच्छा नव्हती. तो वीडी पण ओढू लागला. आता गिऱ्हाईक मिळवायची त्याला अजिबात घाई नसायची. कोण आलेच तर त्याला सोडायचे. घरी जेवण पण मिळत नसे. तो स्वतः काहीतरी खाउन पोट भरायचा.

एके दिवशी एक वृध्द महिला त्याच्या टांग्यात बसायला आली. तीने त्याला बाजारात न्यायला सांगितले. फिरुन फिरुन एका दुकानासमोर तिने टांगा थांबवला. ते दुकान म्हणजे तेच, ज्या दुकानातील फ्रॉक त्याला सीतारासाठी घ्यायचा होता. ती बाई खरेदी करुन पुन्हा टांग्यात बसली. तीला अब्दुल्लाने ईच्छीत स्थळी सोडले. तीने अब्दुल्लाला जबरदस्तीने ५० रुपये दिले.

अब्दुल्ला घरी परतला. त्याने ते ५० रुपये आपल्या बीबीकडे दिले. स्वयंपाकघरामध्ये जाउन स्वतः जेवण घेतले. इकडे अब्दुल्लाची पत्नी बाहेर आली. तीला टांग्यात एक पार्सल दिसले. अब्दुल्लाच्या टांग्यात पार्सल? कुतूहलाने तिने ते पार्सल खोलले. त्यात निळा फ्रॉक गुंडाळला होता. ती तडक आत आली.

"ये क्या है? मेरे जखमोपर नमक डालने ये लाया है? जब बच्ची फ्रॉक मांग रही थी,तब आपने नही दिया। बच्ची आपका नाम लेते लेते मर गयी, लेकिन आप नही आये। आपके पास ये पैसे भी थे। तुम्हारे जैसा जानवर मैने कभी नही देखा। तुम क्रुर शैतान हो। "

अब्दुल्ला उष्टया हातांनी उभा होता. त्याने ते ताट तसेच टाकले आणि बाहेर आला. टांग्यात बसला आणि ढसाढसा रडू लागला. आज अब्दुल्लाचे अश्रू थांबत नव्हते. तो वेडयासारखा रडत होता. अब्दुल्ला तेथेच बसला. एवढया दिवसांचे दुःख आज त्याच्या डोळ्यात उतरले होते.

Tuesday, 18 March 2008

सदाफुली

सदाफुली


नवीन टाटा सुमो


नवीन टाटा सुमो

टाटांची नवी सुमो आपण पाहिली असेलच. मी पण काल पाहिली आणि पाहताक्षणी मला गाडीची रचना आवडली. ही नवीन कार महिंद्रा स्कार्पिओला टक्कर देण्यासाठीच बनवली असावी. या गाडीची रचना स्कार्पिओ सारखीच वाटते. गाडीची अंतर्गत रचना आकर्षक आहे. पॉवर विंडो, पॉवर स्टीअरींग, एम्.पी.थ्री प्लेयर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या कारमध्ये शक्तीशाली स्पिकर सिस्टीम आहे.

ही कार सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार एल्.एक्स.,जी.एक्स आणि ई-एक्स अशा तीन प्रकारात उपलब्ध आहे. त्यातही ६+१ आणि ७+१ अशा आसनक्षमतेत ही कार उपलब्ध आहे. कारला २ वर्ष वॉरंटी आहे. २ वर्ष किंवा ७५,००० कि.मी. जे लवकर पुर्ण होइल ते. कारची किंमत अंदाजे ६.५० ते ७.५० लाख राहील(दिल्ली शोरुम)

गाडीची काही वैशिष्टये

मोठे स्पष्ट दिसणारे दिवे
फ्रंट एअर डॅम
व्हीलबेस २५५० एम्.एम्.
३ रो सिटींग
डीकोर इंजीन ( DICOR- direct injection common rail )
पॉवर विंडो
पॉवर स्टीअरींग
एम्.पी.थ्री प्लेयर

Sunday, 16 March 2008

पहारा


कोकणात आता आंब्याचा मोसम सुरु झाला आहे. आंबा,काजू,फणस,जांभुळ ही फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या दरम्यान आंब्यांच्या बागेमध्ये कडेकोट सुरक्षा असते. आंब्यांची चोरी होण्याचे प्रकार रोखण्यासाठी मालक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. रात्रीच्या वेळी पहाऱ्याची खरी गरज असते. या पहाऱ्यासाठी अजूनही काही ठिकाणी कंदील वापरले जातात. आज मी रत्नागिरी येथील एका स्थानिक बागेस भेट दिली, त्यावेळी हा कंदिल मला तेथे दिसला. तेथे टिपलेले हे क्षण मी येथे पाठवत आहे.....


- वामन परुळेकर

Saturday, 15 March 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील चौथे पुष्प आहे..

फीडबर्नर
http://www.feedburner.com/fb/a/home


फीडबर्नर संकेतस्थळ बऱ्याच सुविधा पुरवते. आपल्या ब्लॉगचे फीड आपण येथे देउन आपली वाचकसंख्या वाढवू शकतो. हे संकेतस्थळ आपल्याला ई-मेल वरुन आपल्या ब्लॉगचे अपडेट ईतरांपर्यंत पोहचवण्याची सुविधा पुरवते. म्हणजेच या सुविधेचा फायदा घेउन तुम्ही खाली दाखवलेला चौकोन तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करु शकता.या चौकोनात तुमचे वाचक त्यांचा ई-मेल टाईप करतील. हे केल्यावर तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉगवरील लेख ई-मेल स्वरुपात मिळू लागतील. फीडबर्नर अन्य काही सुविधा पुरवते त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू. ह्या लेखात मी फक्त ई-मेल सुविधेसंदर्भात लिहीणार आहे.

फीडबर्नर संकेतस्थळ उघडल्यावर प्रथम तुमच्या ब्लॉगचा URL किंवा feed address द्यावा लागतो.
वरच्या छायाचित्रात दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा ब्लॉग यु.आर्.एल्. टाईप करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. लक्षात ठेवा तुमचा URL हा http:// ने सुरु झालेला हवा. त्यानंतर तुम्हाला Atom किंवा RSS यापैकी एका URL ची निवड करावी लागेल. समजा तुम्ही RSS फीड चा पर्याय निवडला तर त्यानंतर नेक्स्ट बटण क्लिक करा.
यानंतर पुढील पानावर तुम्हाला तुमचा फीडबर्नर फीड address दिसेल.
तो असा असेल http://feeds.feedburner.com/famtmca हा address तुम्ही बदलू शकता. त्यानंतर तुम्हाला फीडबर्नर अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी युजरनेम,पासवर्ड आणि ई-मेल द्यावा लागेल. हे केल्या नंतर Activate feed बटणवर क्लिक करा. आता हे सगळ यशस्वी झाले की खालील संदेश दिसेल.

Congrats! Your FeedBurner feed is now live. Want to dress it up a little?

त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. त्यानंतर खालील मेनू दिसेल त्यातील Publicize क्लिक करा.
आता डाव्या बाजूला एक उभा मेनू दिसेल त्यात E-mail Subscriptions असे दिसेल त्यावर क्लिक करा. ई-मेल सबस्क्रिप्शनच्या पेजवर योग्य सेवादात्याची नोंद करा.
तीन पर्याय असतील
* Feedburner
* FeedBiltz
* Rmail
यातून एका सेवादात्याची नोंद करा आणि Activate बटण दाबा. त्यानंतर उभ्या मेनूमधिल Subscription management ही लिंक निवडा आणि तेथे खालील पट्टी दीसेल त्यात Blogger वा अन्य सर्व्हीसची निवड करा.
अन्यथा दिलेला कोड page element (html script) ला Copy Paste करा. हे सर्व केल्यावर ई-मेल सुविधा तुमच्या ब्लॉगवर कार्यरत होइल. धन्यवाद.


- वामन परुळेकर

अकबर द ग्रेट


आशुतोष गोवारीकर यांचा जोधा-अकबर अप्रतिम तर आहेच पण त्याचे संगीतही श्रवणीय आहे. ए.आर्.रेहमान यांचे संगीत आणि आषुतोष यांचे चित्रपट यांचे एक अतुट नाते बनले आहे. आशुतोष + रेहमान = हीट हे आता समिकरणच बनले आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते. तो काळ आणि त्याकाळातले वैभव यांचे जिवंत चित्रण झाले आहे. गेल्या आठवडयापर्यंत या चित्रपटाने ४८,४०,००,००० एवढे उत्पन्न मिळविले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत या चित्रपटाने लगान,गुरु,वीर-झारा यासारख्या चित्रपटांना मागे सारले आहे. सध्या ह्या चित्रपटाला हीट श्रेणीत ठेवता येइल मात्र जर ट्रेंड असाच राहीला तर हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल.

परदेशात जास्त यश

गेल्या आठवडयापर्यंत जोधा-अकबर या चित्रपटाने परदेशात ३० करोड कमावले होते. परदेशात ३० करोड पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारा हा सातवा चित्रपट ठरला आहे. एकटया अमेरीका देशात या चित्रपटाने ९ करोड कमावले होते. परदेशात हा चित्रपट सर्वकालीन सुपरहीट ठरला आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावरील बंदी उठवल्यामुळे उत्पन्न अजून वाढण्याची शक्यता आहे. येथे झालेल्या छोटया-मोठया आंदोलनांमुळे चित्रपटाला बरीच प्रसिध्दी मिळाली आहे.

नेपाळची एवरेस्ट बंदी


बी.बी.सी. कडून मिळालेल्या माहितीनुसार चीनमधिल ऑलंपिक आयोजनात कोणताही व्यक्तय येउ नये म्हणून नेपाळने बेस कॅंपच्या पुढील प्रदेशात मे महिन्यापर्यंत प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. चीनने यापूर्विच नेपाळकडे तशी मागणी केली होती. चीनला ऑलींपिक ज्योत एव्हरेस्टवर न्यायची आहे आणि तिबेटी लोकांचा त्याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. हा विरोध टाळण्यासाठी चीनने बंदीची मागणी केली होती. तिबेटी लोक गेली अनेक वर्षे स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत, पण चीन तिबेटला स्वतःची मालमत्ता समजते. तिबेटच्या आंदोलनाचा त्रास होउ नये याची काळजी चीन घेत आहे.

Wednesday, 12 March 2008

मनोरंजक माहिती

काल माझ्या रणजीत नामक मित्राने मला ही मनोरंजक माहिती पाठविली.

" विश्व व्यापार केंद्र अमेरिकाला धडक देणाऱ्या विमानाचा क्रमांक Q33N होता. याच विमानाने ९/११ चा अनर्थ घडवून आणला होता. आता गंमत बघा तुमचे नोटपॅड ओपन करा. तेथे Q33N हा क्रमांक लिहा. फॉन्ट आकार ७२ करा. फॉन्ट Wingdings ठेवा. मला पण समोर जे दिसले त्याने धक्का बसला. काही लोकांनी हे पूर्वी करुन पाहिले असेल. पण ज्यांनी हे प्रथमच् पाहिले त्यांना नक्किच धक्का बसला असेल.

Tuesday, 11 March 2008

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

रविवार लोकसत्ता मधील मऱ्हाटी नेट-भेट या सदरात मराठीसमुदाय या ब्लॉगची वाचनिय ब्लॉग म्हणून दखल घेतल्या बद्दल धन्यवाद.स्त्री-पुरुष समानता?

काल येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयातील एका अलिखित नियमाबद्दल कळले. त्या महाविद्यालयात मुलींनी भारतिय कपडे परीधान करावेत आणि स्त्री शिक्षिकांनी साडी नेसावी असा अलिखित नियम आहे. मात्र पुरुषांनी परदेशी शर्ट पॅंन्ट घातले तरी चालेल. बऱ्याच ठिकाणी असे अलिखित नियम असतात.

मुलींनीच का म्हणून भारतिय वस्त्रे परीधान करावित ? हा नियम पुरुषांना का लागू होत नाही ? खरे तर ज्या ठिकाणी असा नियम असेल त्या ठिकाणी पुरुषांनी धोतर वा अन्य भारतिय वस्त्र नेसले पाहिजे. अन्यथा स्त्री-पुरुष समानता साध्य होणार नाही.

एक युक्तीवाद असाही दिला जातो की, स्त्रीयांनी परीधान केलेली परदेशी वस्त्रे ही पुरुषांचे चित्त विचलित करतात. उदा. जिन्स-टॉप्स. हा युक्तीवाद मला पुर्णपणे चुकीचा वाटतो. जिन्स टॉप्सने स्त्रीयांचे पुर्ण अंग झाकले जाते. उलट साडीत जास्त अंगप्रदर्शन होण्याची शक्यता असते. खरे तर स्त्रीयांनी काय घालावे हे सांगण्याचा अधिकार पुरुषांना नसावा.

जर एखाद्या संस्थेत कपडयांची आचारसंहिता करायची असेल तर ती स्त्री पुरुष भेद न करता दोघांना सारखी असावी. पुरुष जेव्हा स्किन फिट जिन्स घालतो तेव्हा ते चालते, उघडा नाचणारा सलमान खान चालतो हे अस का? नियम सर्वांना सारखे असावेत.


Monday, 10 March 2008

महाशिवरात्र उत्साहात साजरी

महाशिवरात्र उत्साहात साजरी

महाराष्ट्रात महाशिवरात्र पारंपारीक पध्दतीने साजरी करण्यात येते. प्रमुख कुणकेश्वर, त्र्यंबकेश्वर, हिरण्यकेशी, रामेश्वर याठीकाणी महाशिवरात्र मोठया प्रमाणात साजरी करण्यात येते.

कोकणात प्रत्येक गावात शिवमंदीर असतेच. कोकणातील बऱ्याच गावांची ग्रामदेवता शंकर आहे. त्यामुळे येथे महाशिवरात्रीचा उत्साह मोठा असतो. गावोगावी जत्रा भरतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने तीन दिवस जत्रोत्सव असतो. महाशिवरात्रीला रथोत्सव, दिपदान,दशावतारी नाटक असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात महाशिवरात्रीला नमन सादर केले जाते. येथे दशावताराची प्रथा नाही. नमन पहायलाही ग्रामिण भागात बरीच गर्दी होते.

बदलत्या काळानुसार महाशिवरात्र साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. फटाक्यांची आतिषबाजी, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, नाट्य स्पर्धा यांचे आयोजनही आता होउ लागले आहे.


मी भेट दिलेल्या पांडवकालीन शिवमंदीराची ही छायाचित्रे..... श्री सिध्देश्वर, पाटीलवाडी, मिरजोळे(पांडवकालीन शिवमंदीर).

- वामन परुळेकर
Sunday, 9 March 2008

वाचनिय ब्लॉग

रविवार लोकसत्ता मधील मऱ्हाटी नेट-भेट या सदरात मराठीसमुदाय या ब्लॉगची वाचनिय ब्लॉग म्हणून दखल घेतल्या बद्दल धन्यवाद. सविस्तर बातमी बघण्यासाठी येथे क्लिक करा.  

Thursday, 6 March 2008

युटोपिया २००८

युटोपिया २००८
काल रत्नागिरीमधिल फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिकोत्सवाचा प्रारंभ झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कालच्या पहिल्या दिवशी स्वरसंध्या, कलाकृती , प्रश्नमंजुषा हे अन्य कार्यक्रम पार पडले. त्याची ही क्षणचित्रे...


फिनोलेक्सच्या कलादालनात भरलेले रांगोळी प्रदर्शन

हाय टी साठी लागलेली लांबलचक रांग


Monday, 3 March 2008

पाउले चालती सिंधुदुर्गची वाट......

पाउले चालती सिंधुदुर्गची वाट......
भराडी देवी आणि कुणकेश्वर यांत्रांमुळे सध्या सर्व भाविक मोठया प्रामाणावर सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.

Sunday, 2 March 2008

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून हीच अपेक्षा होती.


ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हेडनने एका स्थानिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंगची "जंगली,चीड आणणारा, किळसवाणा" संभावना केली होती. यात विषेश असे काही नाही. जंगली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून सभ्यपणाची अपेक्षा ठेवण म्हणजे अतिशयोक्ती होइल. तेथील प्रसारमाध्यमांनीही हेडनला जोरदार पाठींबा दिला आहे. एका वृत्तपत्राने तर, हेडन जे बोलला ते आम ऑस्ट्रेलियन जनतेच्या मनातले होते असे वाटते.

भारतीय क्रिकेट बोर्ड मात्र हरभजनलाच आगाउपणा करण्याचा सल्ला देतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियमच वेगळे असावेत असे मला वाटते.

उदा.

>ऑस्ट्रेलियन जे काही करतात किंवा वागतात ते सर्व क्रिकेट हीतासाठीच असत.
>ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जर तुमच्याकडे पाहून काही बोलले तर मान खाली घालून पुढे जा. उलट उत्तर दिल्यास शिक्षेस पात्र व्हाल.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बाहेर मिडियाबरोबर काहीही बोलण्यास स्वतंत्र आहेत.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी घातलेल्या शिव्या हा स्पष्टवक्तेपणा समजावा .
> ऑस्ट्रेलियन जनतेला प्रतिस्पर्धी खेळाडुंवर अंडी मारण्याचा पुर्ण अधिकार आहे.
> ऑस्ट्रेलियन हे देव नाहीत त्यामुळे शेरेबाजी करण्यास ते मुक्त आहेत.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हे वेळ पडल्यास जिंकण्यासाठी पंचांची मदत घेउ शकतात.

क्रमशः

ShareThis

Visitors Worldwide

free counters