दिनांक २९ उजाडला, आम्ही पहाटे पाचला उठलो कारण सकाळी ७ची वेंगुर्ला-अक्कलकोट गाडी गाठायची होती. अखेर वेंगुर्ला-अक्कलकोट जलद बस मिळाली. कोल्हापूरला उतरुन बस बदलायची होती. वेंगुर्ला-कुडाळ २० किमीच अंतर पार करत गाडी आता मुंबई-गोवा महामार्गावरुन धावत होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजुचा परीसर निसर्गरम्य. मन प्रसन्न होउन जाते. हिरवीगार वृक्षवल्ली, हिरवगार शेत आणि अधुन मधुन दिसणाऱ्या छोटया छोटया नद्या. सार काही अवर्णनीय.
कणकवलीच्या पुढे घाट रस्ता सुरु झाला. हा गगनबावडा घाट सह्याद्रीतून जाणारा धोकादायक घाट समजला जातो.अरुंद वळणावळणाचा रस्ता भितीदायक वाटत होता. खिडकीतुन सह्याद्रीची विविध रुप दिसत होती. हातातल्या कॅमेराने मी ती दृश्ये टिपत होतो. विलोभनिय उंच कडे, खोल दरी, मागे लहान होत चाललेला रस्ता. अगदी घाट संपता संपता दुर उंचावर गगनगिरीवर महाराजांचा मठ दिसतो. घाट संपल्यावर बस चहासाठी गगनबावडा बसस्थानकावर दहा मिनीटे थांबली. बस स्थानकावर एक छोटस हॉटेल होत, मस्त वडा-पाव चा वास येत होता, माझ्या तोंडाला पाणी सुटल. तीन वडा- पाव पार्सल घेतले गाडीत खायला. बसस्थानकावर मी शिरा खाल्ला. चविष्ट शिरा. उत्तम.. वडे पण बेस्ट होते. कोल्हापुरी मोठे वडे चविला पण चांगले असतात.
आता बस कोल्हापुरच्या मार्गाला लागली. हा रस्ता फारच खराब होता. उसाच्या वाहतुकीमुळे असेल, बस सारखी हलत होती. कोल्हापुर जिल्ह्यातील छोटी-मोठी गावे पाहत होतो. उस आणि साखर कारखाने या दोनच गोष्टी दिसत होत्या. सहकार या भागात बराच रुजलेला. येथील लोकही कष्टाळु आहेत. तसे कोल्हापूरला मी खुपदा गेलोय. कोल्हापुर म्हटल की आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ,लाल रस्सा,कोल्हापुरी रंकाळावरची भेळ आणि सगळयात लोकप्रिय कोल्हापुरी चप्पल , आजकाल फार कमी लोकांच्या पायात दिसते आणि फार कमी लोग जे चप्पल घालतात त्यांना अडवल जातय(मराठी कलाकारांबरोबर घडलेला प्रकार).
अचानक आमची बस थांबली. समोर उसांनी भरलेली बैलगाडयांची रांग रस्ता ओलांडत होती. ह्या बैलगाडया कोल्हापुरच वैशिष्ट. आमच्या कोकणातुन बैलगाडया जवळजवळ हद्दपार झाल्यात पण येथे अजुन टिकून आहेत. या बैलगाडया पार झाल्यावर पुढे एका गावात जनावरांचा बाजार भरला होता. अगदी रस्ताजवळ हा बाजार भरला होता. त्यामुळे गाडी एकदम हळु चालत होती. गायी,बैल,म्हैशी,रेडा असे सगळे शेतकऱ्यांच्या उपयोगातले प्राणी बाजारात उपलब्ध होते. हे सगळ बघुन मला जुन्या मराठी चित्रपटातील दृश्य आठवली. पण बैलाचा आणि माझा ३६ आकडा मला अजिबात लाज वाटत नाही हे सांगायला की मी बैलाला घाबरतो. त्याचे झाले असे , लहानपणी एकदा रस्त्यावरुन जाणाऱ्या बैलाची शेपटी पकडण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी त्या रागीट बैलाने जोरात शेपटी माझ्या तोंडावर मारली आणि मी लोटांगण घातले. त्यावेळी बरच खरचटल होत. तेव्हापासून बैल दिसला की चार हात लांबुनच जातो.
क्रमशः
No comments:
Post a Comment