Tuesday 10 April 2012

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

आजवर ज्या महान व्यक्तींनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज आपण अशाच एका महान समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीने  समाजाच्या आणि गावाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपल पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या व्यक्तीबद्दल लिहायला मिळणे हे मी माझ भाग्य समजतो. निर्भय समाजसुधारक, भाषाशास्त्रज्ञ आणि उदारमतवादी विचारवंत कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्म २४ डिसेंबर १८५० या दिवशी अहमदनगर येथे लष्करी छावणीत झाला. त्यांचे वडील कै. धोंडजी सखाराम खानोलकर हे ब्रिटीश लष्करात नोकरीस होते. धोंडजी खानोलकर हे बुद्धीमान, नम्र आणि विद्याव्यासंगी होते. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे ते लष्करात खूप लोकप्रिय होते. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये होती. डॉ. रामजी हे जेष्ठ चिरंजीव. डॉ. रामजी अत्यंत हुशार असल्यामुळे वडीलांनी त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. डॉ. रामजी खानोलकर यांचा जीवनप्रवास बराच खडतर होता. कराची येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. रामजी सकाळी काम करायचे आणि रात्री एकाग्रतेने अभ्यास करायचे. त्यांनी स्वयंशिस्त कधीच मोडली नाही.

कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असल्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी ते मेडीकल स्कूलची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची नेमणूक लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन म्हणून झाली. त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला. इराण, अफगाणिस्तान, एडन, चीन, अरबस्थान या देशांचा प्रवास त्यांनी केला. १८८६ साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली. १९०० च्या चीन मधील बॉक्सर युध्दात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. १९०६ साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांनी क्वेटयातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. क्वेटा शहरात त्यांनी स्वत:चा खाजगी दवाखाना सुरू केला. क्वेटातील पंजाबी, बलुची, सिंधी, शीख जमातीमध्ये ते खूप लोकप्रिय होते. लोकांना रामजींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्याकाळी दिवाण जमित राय आणि रामजी खानोलकर यांची "Grand Old Men of Quetta" अशी ओळख होती. एक कोकणी डॉक्टर बलूचीस्तानच्या क्वेटा शहरात निस्वार्थीपणे मानवसेवा करत होता याच अनेकांना आश्चर्य वाटायचं. त्यांच्या कार्याचा बलुची लोकांवर खूप प्रभाव होता.

रामजी चांगले डॉक्टर तर होतेच पण ते चांगले माणूस आणि नागरिक देखील होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू होता. अखिल मानवी समाजाबद्दल त्यांना प्रेम होते आणि त्यामुळेच ते आदरणीय होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. संकुचित दृष्टिकोन कधीच नव्हता. समाजाला सुधारायचे असेल तर शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराच पवित्र कार्य हाती घेतलं. समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, "He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community."

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला.  १९०३ साली मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी खानोलकर यांनी शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेब यांनी गावच्या मुलभूत गरजा म्हणजेच विहिरी, धर्मशाळा आणि शिक्षणाची सोय ह्यावर लक्ष केंद्रीत केलं. आजही खानोलकरांनी स्थापन केलेले प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय दिमाखात उभे आहे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. रायसाहेब रामजी खानोलकर यांचे समाजकार्य केवळ स्वत:च्या गावापुरते मर्यादित नव्हते. क्वेटातही त्यांनी बरेच समाजकार्य केले. क्वेटा येथे त्यांनी स्वखर्चाने बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या समाजसेवेच्या प्रभावामुळे क्वेटा येथील रस्त्याला "रामजी लेन" असे नाव दिले होते. आजही स्वतंत्र पाकिस्तानने हे नाव कायम ठेवले आहे. आजही क्वेटा मधील तो रस्ता रामजी लेन या नावानेच ओळखला जातो. पाकिस्तानमधील एका खाजगी कंपनीच्या वेबसाईटवर मिळालेला पत्ता त्याचाच पुरावा आहे.    
       
रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे प्रकांडपंडित होते. त्यांचा वेदांचा अभ्यास दांडगा होता. वेदांतील आदर्श जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत. परोपकारी वृती मानवी जीवनात फार महत्त्वाची आहे. परोपकार विरहीत जीवन जगणारा मनुष्य हा कोणत्याही धर्मात धिक्कार करण्यासारखाच असतो. परोपकार करणारी कोणतीही व्यक्ती पूजनीय असते. प्राणी मेल्यावर त्याची चामडी जर उपयोगात येत असेल तर तो प्राणीही धन्य आणि पूजनीय बनतो.
परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । 
जीवन्तु पशवो येषां चर्माप्युपकरिष्यति॥ 
कालिदासाच्या साहित्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. रायसाहेब  रामजी खानोलकर अतिशय सात्विक होते. ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना कधीही तंबाखू किंवा दारू इत्यादी व्यसनांचा स्पर्शही झाला नाही. रायसाहेब दर दोन वर्षांनी आपल्या मठ येथिल घरी येत असत. त्यावेळी वाटेत कराचीत ते आपल्या मित्रपरीवाराची जरूर भेट घेत असत. कराची मुक्कामात डॉ. दत्ताराम खानोलकर यांच्या घरी ते सर्वांची भेट घेत असत. डॉ. विश्वनाथ पाटील आणि तुकाराम कांदळगावकर हे त्यांचे खास मित्र होते. मुंबईत आल्यावर आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांची भेट घेतल्याशिवाय ते राहत नसत. त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर हे नाईक मराठा मंडळाचे संस्थापक होते. दोघेही एकाच समाजासाठी काम करत होते फक्त संस्था वेगळ्या होत्या. दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर होता.      

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद त्यांचे परम मित्र होते. रायसाहेबांनी आपल्या एका मुलाची रवानगी वैदिक ब्रम्हचारी चे जीवन जगण्यासाठी स्वामींच्या हरिद्वार येथिल आश्रमात केली होती. रायसाहेब धार्मिक होते. त्याचबरोबर धर्मसुधारणेवर त्यांचा भर होता. काशी येथे विद्वान पंडीतांची ते वेळोवेळी भेट घेत आणि चर्चा करत. रायसाहेब डॉ. खानोलकर यांच्या संस्कृत प्रेमाबद्दल लिहिताना सावित्रीबाई खानोलकर यांनी म्हटले आहे की,  "He had the perfect pronunciation of a Pundit and seemed to relish every word. Do you know that there are more than 20 words in Sanskrit for Water? He would tell me in the way people speak of some wonder of magic and then proceed to enlighten me as to each word and its meaning. I listened bemused and entranced by the music of those words even though I understood nothing of them at that time. I gather, it is from him that I acquired the love of Sanskrit and the desire to learn this perfect and alas neglected language." 

रायसाहेबांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, उर्दू, पुस्तू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. कालीदासाचे शाकुंतल तर त्यांना पूर्ण अवगत होते. तसेच पर्शियन कविता मुखोद्‌गत होत्या. रायसाहेब संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी काशी येथील पंडीतांच्या सहवासात काही महिने घालवत असत. त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. क्वेटा येथे त्यांचे स्वत:चे ग्रंथालय होते ज्यात जगातील दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होता. १९३५ च्या दुर्दैवी भूकंपात हे ग्रंथालय जमीनदोस्त झाले. त्यांनी मुक्तवली कंठाभरणशाडंकर भाष्य हे संस्कृत ग्रंथ छापण्याचा कामी बरेच सहाय्य केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी संस्कृत-धात्वर्थ-मंजुषा नामक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथाला जर्मनीतून प्रचंड मागणी आली होती. त्यांनी काही काळ केसरी वृत्तपत्रासाठी लेखन केले. चीन मध्ये असताना चीनची संस्कृती तेथील चालीरीती या संबंधित लेखं "चीनची पत्रे " या सदरात लिहिले.

डॉ. खानोलकर यांचा परिवार बराच मोठा होता. त्यांचे आठ पुत्र, एक कन्या, सुना, नातू नाती, नोकर चाकर मिळून ३०-३५ लोकांचे मोठे कुटुंब होते. "बाबा" ह्या टोपणनावाने ते कुटुंबात प्रसिद्ध होते. संपूर्ण कुटुंबावर त्यांच लक्ष असे. क्वेटा मध्ये त्यांचा मोठा वाडा होता तसेच मठ वेंगुर्ले येथे मूळ घर होते. वाड्याची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांची पत्नी जानकी (ताई) खानोलकर यांच्यावर असे. डॉक्टरांनी सर्व कुटुंबियांना योग्य त्या सोयी पुरवल्या. त्यांच्या उच्चशिक्षणाची सोय केली. खानोलकरांच्या कुटुंबात शिक्षण हे सक्तीचेच होते. त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडीलांच्या इस्पितळात सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांचे दुसरे पुत्र कर्करोगतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वसंतराव खानोलकर. मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर. नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉ. प्रकाश खानोलकर. सून सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली. या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीने रायासाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली. रायसाहेबांचे बंधू कै. विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या जेष्ठ बंधूने सुरू केलेले समाजकार्य तसेच चालू ठेवले. त्यांनीच मठ येथिल डॉ. खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केल.                      
रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांनी प्रामाणिकपणे जे समाजकार्य केले होते त्याची दखल तत्कालीन सरकारने घेतली. १९२८ साली त्यांना "रायसाहेब" हा खिताब देवून गौरविण्यात आले. १९३२ साली त्यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत संपतराव गायकवाड, बडोदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मित्रपरिवाराने श्री जगन्नाथ शंकरशेठ यांच्या दिवाणखान्यात त्यांचा मानपत्र देवून सत्कार केला.      

अशा या समाजसुधारकाचा आणि समाजनेत्याचा मृत्यू  ३१ मे १९३५ रोजी पहाटे ३:०२ मी. क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला. त्यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू या भूकंपात झाला. क्वेटातील ६०००० लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता. डॉ. खानोलकर विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते. त्यांनी आपल्या कार्याने स्वत:चा ठसा उमटवला. सामजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासासाठी खर्ची घातल. स्वत:चा आदर्श समाजासमोर ठेवला. कोकण आणि कोकणी लोक यांच्याबद्दल त्यांना फार आपुलकी होती. कोकणातील शिक्षणप्रसाराला त्यांनी हातभार लावला. त्यांचा मुत्यू दुर्दैवी होता पण त्यांच निस्वार्थी कार्य कायम आपल्या सर्वांच्या हृदयात राहील यात शंकाच नाही. त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण आणि त्यांच समाजकार्य पुढे चालू ठेवणे हे आता आपलं कर्तव्य आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की असे महापुरुष ज्या समाजात जन्मले त्या समाजाचा अभिमान बाळगा आणि सर्वच मानवी समाजाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी कार्यरत राहा. धन्यवाद.

जीवितान्मरणं श्रेष्ठ परोपकृतिवर्जितात् ।
मरणं जीवितं मन्ये यत्परोपकृतिक्षमम् ॥

1935 Balochistan earthquake

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters