Monday, 2 April 2012

आमची शाळा - भाग १

शाळा चित्रपट पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा आई वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर पुन्हा कुणी उचलली नाही. उचलली ती केवळ लेखणीच. असो तर महत्वाच हे की आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची भटकी जमातच झाली होती. बदली झाली की शाळा बदलली. मी आरवलीत माझी बालवाडी पूर्ण केली. आरवली म्हणजे शिरोड्याच्या बाजूलाच पेडण्याहून अगदी जवळ. पुढे पहिली-दुसरी आणि तिसरी इयत्ता उभादांडा शाळा नं. २ मध्ये, चौथी ते सातवी मठ शाळा नं. १, आठवी - दहावी जनता विद्यालय तळवडे, अकरावी - बारावी राणी पार्वतीदेवी ज्यु. कॉलेज सावंतवाडी, पदवी शिक्षण कुडाळ आणि पदव्युत्तर रत्नागिरी.

कॉलेज विश्व हे एक वेगळंच जीवन असत. शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोरून माझ पाचवी ते दहावीच जीवन एखाद्या फिल्मसारख सरकत जात. विशेषतः हायस्कूल. सावंतवाडीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर तळवडे नावाच एक सुंदर गाव आहे. जबरदस्त सांस्कृतिक आवड असलेलं गाव. येथे बाराही महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच. मी त्यावेळी अनेक प्रसिद्ध नाटके याच गावातील रंगमंचावर पाहिली. श्रीमंत गाव. तर अश्या या गावात आमच श्री जनता विद्यालय आहे. शाळेतले ते दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आमच्या या शाळेत तीन तुकड्या होत्या अ, ब आणि क. मी अ तुकडीतला विद्यार्थी होतो. गावातील तथाकथित सुशिक्षित लोकांना कॉन्व्हेंट च आकर्षण होत. पण अस आकर्षण आम्हाला कधीच नव्हत कारण जनता विद्यालयात जे शिक्षण मिळणार ते कितीतरी पटीने चांगल असेल याची आम्हाला खात्री होती.

तीन वर्षाने शाळेने मला बरच काही दिल. मला आमचे पाटकर सर कायम आठवतात. असा दरारा की लांबून त्यांना बघितलं की मुल पळून जायची. पाटकर सरांबद्दल आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या हातचा मार खायची हिंमत कोणातच नव्हती. सरांचा तास असला की सर आम्हाला संपूर्ण जगाची फेरी मारून आणायचे. जागतिक घडामोडी आणि त्याचा परिणाम याची आवड मला याच दरम्यान निर्माण झाली. Y2K काय आहे हे आमच्यापेक्षा मोठया असलेल्या मुलांना माहिती नव्हते पण आम्हाला मात्र पूर्ण माहिती होती. कारण फक्त पाटकर सर. पेडणेकर सरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. सहामाही परीक्षेत मराठीत केवळ ४८ मार्क्स मिळाल्याच दुःख माझ्यापेक्षा पेडणेकर सरांना जास्त होत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल आणि दहावीत मी ७८ गुण मराठीत मिळवले. शिस्त मोडल्यावर मालवणकर सर आणि गणिताच्या पवार सरांच्या हातचा मारही खाल्ला. मार कसला थोबाडीतच मारली होती. सगळ जग हलल्यासारख वाटल होत. पण एकदा मार खाल्ल्यावर पुन्हा शिस्त मोडण्याची हिंमत नाही झाली.

आमच्या वर्गात तशी इरसाल मुले होती. मला अजूनही आमचा अड्डा आठवतो. शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही जवळच्या सातेरी मंदिरात जमायचो. त्यावेळी मी घोडेस्वार होतो अर्थात सायकल. हे मंदीर परिसर म्हणजे सायकल फिरविण्याची आवडती जागा. जरा पुढे उंचावर एक छोट मंदीर होत आता नाव नाही आठवत पण तोही आमचा अड्डा होता. प्रार्थना चुकविणारी मुले तिथे थांबायची. मला आठवतंय प्रार्थना चुकली तर शिक्षा असायची. चुकून कधी उशीर झालाच तर ही शिक्षा चुकविण्यासाठी आम्ही सरांची नजर चुकवून हळूच रांगेत घुसायचो. शाळेच लांबच्या लांब मैदान आम्ही फुटबॉल खेळण्यासाठी वापरायचो. दुपारची जेवणाची सुट्टी त्यासाठीच होती. पटापट डब्यातल खावून गेटावरच्या दुकानात जावून वाटाणे किंवा फुटाणे आणायचे (आम्लेट पाव ही आमच्यासाठी त्यावेळी पार्टी दिल्यासारखच होत.) आणि ते संपवून नंतर रबरी छोट्या बॉलने फुटबॉल खेळायचा हा आमचा नित्यक्रम झाला होता. मला आठवतय मी, दोन अमित, रोशन, कांता, विवेक आणि आमचे इतर मित्र कधी एकदा मैदानावर जायला मिळतय याची वाट पाहात असायचो.

किस्से अनेक आहेत पण कायम स्मरणात राहण्यासारखा किस्सा म्हणजे आमची शालेय निवडणूक अगदी थाटात असायची. मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, वर्गमंत्री वगैरे सगळी पद असायची. मीही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची निवडणूक याच काळात लढलो. आमच्या शाळेत प्रचारही करणे बंधनकारक होत. अगदी सभा वगैरे सगळ चालायचं. मी क्रीडामंत्री या पदासाठी उभा होतो. तरी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात माझी उमेदवारी मजबूत होती. प्रचार सभा घेतली. गंमत म्हणजे माझ्या विरोधी पक्षातील मुलांनी मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो आहे अशी अफवा पसरवली. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्याशी माझी बाचाबाची देखील झाली आणि माझ निवडणूक हरणं नक्की झाल. मतदानाचा दिवस उजाडला. निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता. मला दोन नंबरची मत मिळाली होती. नियमाप्रमाणे मी उपमंत्री झालो होतो. केवळ दहा मतांनी मी हरलो होतो पण हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या लोकशाही परंपरेनुसार आपला देश चालतो त्याच बाळकडूच आम्ही प्यालो होतो.

शाळा म्हटल की लाईन हा विषय आलाच पण त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही एकमेकांना खूप चिडवल लाईनच्या नावावरून. अगदी बापाच्या नावावरुनही चिडवलय. आमच्याकडे बिलीमारो पण होता, बेलदार पण होता आणि टिंग्या पण होता. अगदी प्रत्येक शाळेत असतो त्याप्रमाणे. शाळेबद्दल लिहाव तेवढ कमी आहे. शाळा सोडून जाताना प्रत्येकाला दुःख हे होत असतच. शाळा आपल्याला आठवणीची शिदोरी देते. आयुष्यभर पुरण्याइतकी.

No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters