Wednesday 13 July 2011

मास्टर दिनानाथ मंगेशकर

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी निकराची झुंज देत संघर्षमय जीवन जगणारे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. गोव्यातील मंगेशी हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट तर आईचे नाव येसूबाईराणे होते. कै. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ओळख प्रसिद्ध संगीत नाट्यकलाकार, संगीतकार आणि गायक अशी आहे. संगीत नाटक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक संगीत नाटकांत काम केले.

वयाच्या  पाचव्या वर्षी दिनानाथांनी बाबा माशेलकर यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे संगीत शिकण्यास त्यांना वेळ लागला नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची शैली आत्मसात केली. दिनानाथांनी बिकानेरला जाऊन शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडीत सुखदेव प्रसाद यांच्याकडून घेतले. पंडीत सुखदेव प्रसाद हे पंडीत मणीप्रसाद यांचे वडील. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर दिनानाथ पुन्हा महाराष्ट्रात परतले. त्यांनी सावंतवाडीच्या रामकृष्णबुवा वझे यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. रामकृष्णबुवा वझे हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक होते. वझेबुवांनी केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, भालचंद पेंढारकर अशा दिग्गजांना संगीताचे शिक्षण दिले. 

वयाच्या १६ व्या वर्षी दिनानाथांनी किर्लोस्कर मंडळीत काम करायला सुरुवात केली. दिनानाथांनी किर्लोस्कर नाटक मंडळी आणि किर्लोस्कर संगीत मंडळी या मंडळातून सुरुवात केली. किर्लोस्कर संगीत मंडळी या संस्थेत अनेक लोकप्रिय संगीत नाटके त्यांनी केली. काही वर्षे किर्लोस्कर मंडळी सोबत काम केल्यानंतर दिनानाथांनी त्यांचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्या मदतीने बलवंत संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली. बलवंत नाट्यसंस्था उभी राहिली आणि दिनानाथ निर्माते झाले. अनेक लोकप्रिय संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केली. दिनानाथांनी एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडल्या. ते निर्मातेही होते, रचनाकारही होते, कलाकार होते आणि गायकही होते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. दिनानाथांनी रुद्रविणेच्या वापरास प्रोत्साहन दिले. त्यांच्या आग्रहामुळेच पंडीत कृष्णराव कोल्हापुरे रुद्रवीणा उस्ताद मुराद खान यांच्याकडून  शिकले. २५ नोव्हेंबर १९२२ ला दिनानाथांनी पणजीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात पोर्तुगीज गव्हर्नर जनरल उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमानंतर दीनानाथांचे कौतुक केले. त्यांना दोन सोन्याची पदके देऊन त्यांच गौरव केला. याप्रसंगी गव्हर्नर जनरल यांनी दिनानाथांना उद्देशून Filho de Goa (गोव्याचा सुपुत्र) असे गौरवोद्गार काढले.        

वयाच्या २२ व्या वर्षी १९२२ मध्ये दिनानाथ थाळनेर येथिल नर्मदा लाड यांच्याशी विवाहबद्ध झाले. दिनानाथांनी त्यांचे नाव श्रीमती असे ठेवले. त्यांना लतिका नावाची मुलगी होती पण तिचा मृत्यू झाला. नजीकच्या काळातच श्रीमती यांचाही मृत्यू झाला. १९२७ साली दिनानाथांनी द्वितीय लग्न अत्यंत साधेपणाने केले. द्वितीय पत्नीचे नाव त्यांनी शुद्धमती असे ठेवले. शुद्धमती ह्या माई म्हणून देखील ओळखल्या जायच्या.

१९३५ च्या दरम्यान दिनानाथ मंगेशकर यांच्या बलवंत पिक्चर्स या संस्थेने तीन चित्रपटांची निर्मिती केली. दिनानाथांनी आपल्या नाटकातून ब्रिटीश सत्तेला कायमच विरोध केला. त्यांनी वीर सावरकर लिखित संन्यस्त खड्ग हे नाटक रंगमंचावर सादर केलं. ब्रिटीश व्हाइसरॉय च्या समोर शिमल्यात त्यांनी सावरकरांच्या नाटकाचा प्रयोग केला. "रामराज्य वियोग" हे नाटक सोडले तर इतर नाटक पाच अक्षरी होती. दीनानाथांचा अंकशास्त्रावर विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांची नावे पंचाक्षरी असत असा समज होता. देशकंटक, पुण्यप्रभाव, मानापमान. सावरकरांचे नाटक सादर करून दिनानाथांनी ब्रिटीश सत्तेला उघड विरोधच केला होता. दिनानाथ मंगेशकर यांनी अनेक संगीत नाटके रंगमंचावर सादर केली. किर्लोस्कर आणि त्यांच्या संस्थेने विविध नाटके सादर केली ज्यात दिनानाथांनी काम केलं. यात खाडिलकरांनी लिहिलेले संगीत मानापमान, सावरकरांनी लिहिलेले सन्यस्त खड्ग, गडकरींनी लिहिलेले राजसंन्यास, वामनराव जोशी यांनी लिहिलेले रणदुंदुभी या नाटकांचा समावेश आहे. याखेरीज पुण्यप्रभाव, देशकंटक आणि रामराज्यवियोग या नाटकातही दिनानाथ मंगेशकरांनी काम केले.   

दिनानाथ मंगेशकर यांनी समाजाच्या विकासासाठी बरेच योगदान दिले. १९२६ साली जांबुवली येथे भरलेल्या "पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाज" या संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सभेस दिनानाथ उपस्थित होते. पणजी येथे मैफिल घेऊन दिनानाथ मंगेशकरांनी वसतीगृह उभारण्यासाठी शिक्षण फंडाला मदत केली.  दिनानाथांनी वेळोवेळी सर्वच समाजाला मदत केली. १८ डिसेंबर १९३७ रोजी प्रागतिक समाजाच्या मदतीसाठी दिनानाथ मंगेशकर यांनी कार्यक्रम केला यात दत्ताराम पर्वतकर, द्त्तीबाई नागेशकर, केशरबाई काळे यांनी भाग घेतला.  

दिनानाथांनी स्वत:ची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही समाजाला मदत केली. त्यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही जर विसरलो तर ती कृतघ्नता ठरेल. दिनानाथांनी कायम सामाजिक बांधिलकी जपली.  वयाच्या ४२ व्या वर्षी १९४२ मध्ये पुण्यात दिनानाथांची प्राणज्योत मावळली.

Reference : 
  1. Rudra Veena: an ancient string musical instrument By Hindraj Divekar, Robin D. Tribhuwan 
  2. Some immortals of Hindustani music - Susheela Misra 
  3. Profiles of eminent Goans, past and present By J. Clement Vaz

3 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

श्रीमती केसरबाई केरकर या जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्या वझेबुवांकडे ग्वाल्हेर गायकी शिकल्याचे मी कुठे वाचलेले नाहीं.

Waman Parulekar said...

प्रभाकरजी सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

केसरबाई कोल्हापूरला अब्दुल करीम खां यांच्याकडे केवळ आठ महिने शिकल्या. गोव्यात परत आल्यावर रामकृष्णबुवा वझे बुवा यांच्याकडे त्या शिकल्या.वझे यांनी सावंतवाडी संस्थानातील फोंडा येथील नागेशी येथे १८ वर्षे मुक्काम केला.

वयाच्या १६ व्या वर्षी केसरताई मुंबईला गेल्या आणि अल्लादिया खां साहेब (जयपूर-अत्रौली घराण्याचे एक संस्थापक) यांच्याकडे शिकल्या.

मी केसरताई वझे बुवांकडे शिकल्या असे म्हटलंय त्या कुठल्या घराण्याची गायकी शिकल्या याची निश्चित माहिती नाही कारण स्वतः वझे बुवा ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकले होते तसेच त्यांनी जयपूर येथे मनरंग परंपरा देखील शिकली होती. जयपूर येथिल निसार हुसेन खां यांच्याकडे देखील गायकी शिकली होती.

Waman Parulekar said...

@ अनामिक : योग्य ते बदल केले आहेत.

वयाच्या १६ व्या वर्षी केसरताई मुंबईला गेल्या आणि अल्लादिया खां साहेब (जयपूर-अत्रौली घराण्याचे एक संस्थापक) यांच्याकडे शिकल्या. या माझ्या वाक्यामुळे गल्लत झाली आहे. १९२१ च्या सुरवातीला केसरबाई अल्लादिया खां साहेब यांच्याकडे शिकू लागल्या. त्यापूर्वी त्या अनेक गुरुकडे शिकल्या.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters